पंढरपूर (जि. सोलापूर) : ‘आषाढी कार्तिकी विसरु नका मज’ अशी भक्तांकडे विनवणी करणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भक्तांना तब्बल दोन वर्षानी तो योग आला आहे. भूवैकुंठ पंढरीत सोमवारी होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या आनंदमयी, अनुपम सोहळ्यासाठी भाविकांचे डोळे आसुसलेले असून सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे. सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे. त्यामध्ये वारकरी मनसोक्त स्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत. कार्तिकी सोहळ्याच्यानिमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर गेल्या दोन वर्षांत प्रथमच टाळमृदंगासह विठुनामाचा जयघोष ऐकू येत आहे. पंढरपुरातील विविध मार्गावर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळमृदंगाचा गजर करणारे दिंडीकरी असे चैतन्यमय दृष्य पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या कमी असली तरी खासगी वाहने, ट्रॅव्हल्सच्या बसेसनी रविवारी सायंकाळपर्यंत बऱ्यापैकी भाविकांची दाटी पंढरपुरात झाली आहे. मठामठामध्ये चैतन्य फुलले असून कार्तिकीची लगबग सर्वत्र दिसत आहे.
व्यापारी पेठा गजबजल्यावारीच्या निमित्ताने व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून नवीपेठ, संत पेठ, चौफाळा, भक्तीमार्ग परिसरात लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने वारीचे वैभव अनुभवायला मिळत आहे. खेळणी, प्रासादिक साहित्य यासह प्रापंचिक वस्तूंचीही रेलचेल झाली आहे. वाहनांना नो एन्ट्री
शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरताना भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याला बॅरिकेड लावून वाहनांना बंदी केली आहे. यामध्ये सावरकर चौक ते शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्गाचा सहभाग आहे. nस्टेशन रोडकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांना ये-जा करण्यास बंदी करण्यात आली आहे. स्टेशन रोडला मिळणाऱ्या रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत.