सोलापूर : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास शासनाने सहमती दर्शविली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यानी याबाबतचे आदेश लवकरच काढण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अनेक वर्षे वेतनासाठी संघर्ष करणात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची ऑनलाईन आढावा बैठक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ग्रंथालयांच्या नावावर जमा होते. संस्थेचे पैसे संस्थेला मिळाले पाहिजेत. कर्मचाऱ्यांचे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने झाले तर त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांना शासनमान्य ग्रंथालयांचे ओळखपत्र देण्याच्या सूचनाही यावेळी सामंत यांनी दिल्या.
निवडक शासनमान्य ग्रंथालयांमध्ये नवीन ग्रंथ विकण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव तयार करावा. पुणे विभागीय ग्रंथालयाचे कामकाज सध्या तीन ठिकाणांहून चालत आहे. हे कामकाज एकाच ठिकाणाहून चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. लोकमान्य टिळक स्मारक, रत्नागिरी व विभागीय ग्रंथालय रत्नागिरी यांच्या दुरुस्ती प्रस्तावाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी व ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरते ग्रंथालय हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करावे यासाठी सार्वजनिक ग्रंथालय संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. १६ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता शिवालय शिवसेना संपर्क कार्यालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. ना. उदय सामंत यांनी १३ जुलै व ४ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत सदाशिव बेडगे यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
-----
२५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, लेखनिक , शिपाई अशा पदावर २५ हजार २६८ कर्मचारी काम करीत आहेत. ग्रंथालयांना तोकडे अनुदान मिळते. त्यातून अन्य खर्च वाढत असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करावी लागते. काही ग्रंथालयात कमी वेतन देऊन नियमानुसार वेतन दिल्याच्या सह्या घेतल्या जातात. यापुढे त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यास हा प्रश्न राहणार नाही.
--------
बँक खात्यांची माहितीचे संकलन
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेदनांचा प्रश्न निकाली लागणार असला तरी त्यांच्या बँक खात्याचा तपशील शासनाकडे उपलब्ध नाही. येत्या काही दिवसांत हा तपशील जमा करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतरच बँक खात्यात रकमा जमा करण्याची प्रक्रिया पार पडेल. सोलापूर जिल्ह्यात २५०० कर्मचारी आहेत. त्यांचा डेटा पाठविला जाईल, अशी माहिती संघटनेचे सचिव सदाशिव बेडगे यांनी सांगितले