शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बुधवारी पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणाची चौकशी होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. महापुरुषांची बदनामी केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात सोलापुरात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला उत्तर म्हणून आंदोलन करणाऱ्या भिडे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कार्यकर्त्यांची सुटका करावी या मागणीसाठी भिडे समर्थकांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता.
पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. पोलिसांनी विनाकारण लाठीमार केला असा आरोप भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी असेही देशमुख म्हणाले. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी चौकशी होईल असे सांगितले.