समान काम असताना वेतनही समानच द्यायला हवे; निमा स्टुडंट फोरमचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:21 PM2020-11-10T14:21:08+5:302020-11-10T14:21:20+5:30
निमा स्टुडंट फोरमची मुख्यमंत्र्यांना निवेदन; अन्यथा हिवाळी अधिवेशनात आंदोलन
सोलापूर : खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासीयता डॉक्टरांना एकही रुपया विद्यावेतन नसताना त्यांनाही विनावेतन/विनामानधन कोविड ड्यूटी लावण्यात आली. २६ मे १९८१ च्या शासन निर्णयानुसार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आणि आयुष वैद्यकीय अधिकारी या दोघांचे समान काम आहे. त्यात आयुष वैद्यकीय अधिकारी सदैव अग्रेसर असतात. मात्र या दोघांच्या वेतनात ५० टक्क्यांपर्यंत तफावत आढळते. समान काम असताना वेतनही समानच द्यायला हवे, अशी मागणी निमा स्टुडंट फोरम, सोलापूर जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे
आयुर्वेद चिकित्सक व विद्यार्थी यांचा ‘समान काम, समान वेतन’ हा अधिकार असताना शासनाकडून त्यांना वारंवार सापत्न वागणूक देण्यात येते. त्यामुळे आयुर्वेद निवासी डॉक्टर, आंतरवासीयता डॉक्टर आणि आयुष वैद्यकीय अधिकारी यांच्यात अजूनही तीव्र असंतोष आहे. शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना २४ तास ड्यूटी करावी लागते. असे असताना मासिक २४०० ते २८०० असे तुटपुंजे वेतन त्यांना देण्यात येते. त्यात भर म्हणजे त्यांना विनावेतन कोविड ड्यूटीही लावण्यात आली. कोविडबाधेमुळे काही जण गैरहजर असल्याने त्यांचे त्या काळातील विद्यावेतन हे शासन धोरणाविरुद्ध असतानाही कापण्यात आले. शासकीय व शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासीयता डॉक्टर यांना मासिक केवळ ११ हजार विद्यावेतन असताना त्यांनाही कोविड ड्यूटी लावण्यात आली. विद्यावेतनाच्या वितरणात देखील नेहमीच अनियमितता असल्याचे निवेदनात म्हटले आहे
या मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शासन अनुदानित व खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर, शासकीय, शासन अनुदानित व खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासीयता डॉक्टर तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या ताबडतोब पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा असून यावर ताबडतोब कार्यवाही न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.