बार्शी : सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णावरील उपचारात सर्वप्रथम मोनोक्लोनल अँटिबॉडीचा प्रयोग बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांनी केला असून तो यशस्वी ठरला आहे.
आजपर्यंत त्यांनी एकूण पाच रुग्णांवर कोरोनाच्या आधुनिक उपचार पद्धतीने यशस्वी उपचार केला आहे. आणखीन दोन रुग्णांवर आधुनिक उपचार केले जात आहेत. या आधुनिक उपचार पद्धतीचे कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. उलट याचा अवलंब केल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये खूप वेगाने सुधारणा होताना दिसून आली.
याबाबत डॉ. संजय अंधारे म्हणाले, या मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे माणसांनी कृत्रिमरित्या तयार केलेले प्रोटीन आहे. या अँटिबॉडीज रुग्णांच्या शरीरामध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या कारोना व्हायरसला निष्क्रिय करतात. या मोनोक्लोनाल अँटिबॉडीज बारा वर्षे वरील सर्व कोविड रुग्णांमध्ये वापरता येऊ शकतात. ज्या रुग्णांना नुकतीच कोरोना आजाराची लागण झाली आहे व मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत, अशा रुग्णांमध्ये याचा खूप चांगला उपयोग झाला आहे.
एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या रुग्णाला कोरोना संसर्गाची बाधा होण्याची शक्यता आहे, अशा सर्व रुग्णांमध्ये या आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करता येतो.
कोरोना उपचार प्रणालीत आतापर्यंतच्या सर्व उपचार पद्धतीत सर्वात विशिष्ट औषधांमध्ये याची गणना केली आहे. कारण या औषधाचे परिणाम खूप आशादायक आहेत. रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी लागणारा वेळ फक्त ३० मिनिटांचा आहे. परंतु निरीक्षणासाठी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी २४ तास ठेवण्यात येते.
त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांचा मुक्काम फक्त एका रात्रीचा आहे, रुग्णालयाचे बिल हे अगदी नगण्य असेल. या आधुनिक उपचाराबरोबर रुग्णांना इतर अँटिबायोटिक्स व स्टिरॉइड्स देण्याची बिलकुल गरज नाही. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत नाही. रुग्णांचा वेळ, औषधांवरील खर्च, हॉस्पिटलच्या बिलाचा भार खूप कमी होणार आहे.
--
मोनोक्लोनल अँटिबॉडीजना कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयोग करण्यात आलेले सर्वात प्रगत व खात्रीशीर औषध म्हणता येईल. या उपचार पद्धतीद्वारे कोरोनाला पहिल्या टप्प्यात सहज हरवू शकतो.
- डॉ संजय अंधारे
---
माझे वडील गजेंद्र शिंदे यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. तसेच पूर्वी पॅरॅलिसिसचा झटका देखील येऊन गेला होता. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही अँटिबॉडीज तयार झालेल्या नव्हत्या. त्यांना ताप आला म्हणून डॉ. अंधारे यांच्याकडे ॲडमिट केले. तपासणी करता, ते कोरोना पॉझिटिव्ह आले. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मोनोक्लोनल अँटिबॉडीजचे इंजेक्शन घेतले. वडील लगेच बरे झाले.
- ॲड. नितीन शिंदे, रुग्णाचे वडील