शंकर हिरतोट
दुधनी : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पारड्यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाने ४७ हजार मताधिक्य टाकले. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा याच मतदारसंघातून भाजपच्या वतीने उमेदवारी पटकविण्यासाठी लागल्या. यातूनच काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची रंगलेली चर्चा शांत होत नाही, तोपर्यंत नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या नावाचीही एन्ट्री झाली आहे.
अक्कलकोट तालुक्याला सलग दुसरा भूमिपुत्र खासदार लाभला असून, माजी खा. शरद बनसोडे यांच्यानंतर गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या रूपाने दुसºयांदा खासदारकीचे नेतृत्व करण्याची संधी अक्कलकोट तालुक्याला मिळाली आहे. दोन्हीवेळा भाजपला मोठे मताधिक्यही मिळाले आहे. यामुळे आमदारकी पटकविण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळीच निर्माण झाली आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी लोकसभेचे २५ हजारांच्या मताधिक्याला मागे टाकत मोदी लाटेतही १७ हजार मताने काँग्रेसकडे विजयश्री खेचून आणली होती. निवडून आल्यानंतर आ. म्हेत्रे यांनी दुधनी बाजार समितीच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध डावलत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आणले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आ. प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेसाठी तर संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खुला पाठिंबा आ. म्हेत्रे यांनी दिला होता.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीची भिस्त आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर असतानाही याची मदार त्यांचे बंधू काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्यावर सोपवून ते इतर ठिकाणच्या प्रचारात व्यस्त होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चपळगाव, कुंभारी, वागदरी, जेऊर, बोरामणी, वळसंग असे मोठे जिल्हा परिषद गट आहेत. यातील काही गटांवर भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे वर्चस्व असून, अक्कलकोट नगरपरिषद, दुधनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक तर मैंदर्गीत पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून करिष्मा दाखविला आहे. विधानसभेवर लक्ष ठेवून भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी सध्या कार्यरत आहेत. अशात आ. सिद्धाराम म्हेत्रे व आता श्रीकंठ शिवाचार्य हेही इच्छुक असल्याच्या चर्चा अक्कलकोटमध्ये रंगत आहेत.
अशात भाजपमधील गट लोकसभा निवडणुकीत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विजयातून उतराई होण्यासाठी नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय माजी आमदार बाबासाहेब तानवडे यांचे पुत्र प्रसन्न तानवडे, पुतण्या जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे, नगराध्यक्षा शोभा खेडगी आणि महेश हिंडोळे यांच्याही नावाची भाजपकडून चर्चा सुरू आहे.
सिद्रामप्पांचे ‘चॅलेंज’- सन २००९ मध्ये भाजपकडून निवडून आलेले माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी चार वर्षे शांत राहिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मीच उमेदवार आहे’, असा विश्वास देण्याबरोबरच माझ्याशिवाय भाजपला पर्याय नाही, असे चॅलेंजही दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शाब्दी वंचितकडून?- गत विधानसभा निवडणुकीत मनसेकडून नशीब अजमावलेले उद्योगपती मकबूल शाब्दी हे यंदाही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मध्यंतरी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसले नाहीत. आता ते बहुजन वंचित आघाडीकडून विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे समजते.