सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी यादरम्यान धरणात १०३ टीएमसी पाणी होते. रविवारी मात्र केवळ ७०.४४ टीएमसी पाणी होते. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पाच्या तलावातील पाणीही शून्य टक्क्यावर आल्याने या तलावात ठणठणाट दिसून येत आहे.
उजनी धरणाची प्रकल्पीय पाणीसाठा ३३२0 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पात १५१७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असतो. रविवारी धरणात केवळ ६.७८ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी याच दिवशी ४0 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरणात होता. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत असून, त्यामुळे भविष्यकालीन पाणी वाटप नियोजनावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जवळगाव प्रकल्पाची ३४.९२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा मर्यादा आहे. यात आता ५.७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. मांगी प्रकल्पाची ३0.७२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय मर्यादा आहे. यंदाच्या वर्षी १ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0४ टीएमसी इतकाच पाणीसाठा असल्याने हा प्रकल्प कोरडा पडला असल्याचे दिसून येते. आष्टी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.0१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी 0.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0३ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला गेल्याने या प्रकल्पातीलही पाणी नसल्याचे स्पष्ट होत आहे. बोरी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.२९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १.२९ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0५ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. पिंपळगाव ढाळे प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा १२.६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी यात पूर्णपणे शून्य टीएमसी म्हणजेच तलाव कोरडा पडला गेला आहे.
एकरूख प्रकल्पात ५.६३ दलघमी पाणीसाठा !एकरुख प्रकल्पाची ६१ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा आहे. या प्रकल्पात रविवारी केवळ ५.६३ दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. हिंगणी प्रकल्पाचा ४५.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा प्रकल्पीय आहे. यात यंदा ५.४0 दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ 0.१९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला गेला आहे.