सोलापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसागणिक पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या ९७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून त्याची वाटचाल शंभरीकडे झाली आहे. दोन दिवसात शंभर पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दोन लाख इतक्या लोकसंख्येला सध्या टँकरच्या पाण्याचा आधार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
जिल्हाभरातील ९२ गावात व ७0९ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ३५विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात टँकरची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता असून मे महिन्यात तब्बल तीनशे टँकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सांगोला तालुक्यात सध्या २0 टँकरने पाणीपुरठा करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माढा तालुक्यात ७ टँकरने पाणीपुरवठा करण्या येत आहे. करमाळा तालुक्यात १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माळशिरस व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी चार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात ५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात दोन टँकर, अक्कलकोट तालुक्यात ३ तर बार्शी तालुक्यात २ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आला नाही.
वाहतुकीचे अंतर वाढतेय...टँकरसाठी प्रस्ताव आल्यानंतर तातडीने त्याची छाननी करून योग्य निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे आलेल्या प्रस्तावानुसार तातडीने गावांची पाहणी करून गावातील नजीकचे पाणीस्त्रोत सार्वजनिक वापरासाठी करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून होत आहे. अनेक गावात खाजगी पाण्याचा स्त्रोतही कमी पडत असल्याने पाण्याच्या वाहतुकीचे अंतर वाढत आहे.