सव्वासहा कोटींचे सोने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:34+5:302021-02-05T06:48:34+5:30
शिवणे (ता. सांगोला) येथील स्वप्निल मच्छिंद्र घाडगे हा तरुण तीन महिन्यापूर्वी बेंगलोर येथील सिद्धेश्वर शिंदे यांच्या संस्कार एन्टरप्रायजेस या ...
शिवणे (ता. सांगोला) येथील स्वप्निल मच्छिंद्र घाडगे हा तरुण तीन महिन्यापूर्वी बेंगलोर येथील सिद्धेश्वर शिंदे यांच्या संस्कार एन्टरप्रायजेस या गोल्ड रिफायनरीमध्ये कामास गेला होता. तीन महिन्यात त्याने मालकाचा विश्वास संपादन करून तेथे आपला जम बसवला. दरम्यान २८ जानेवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास मालकाने स्वप्निल घाडगे याच्याजवळ १२ किलो ७०० ग्रॅम सोन्याची पिशवी दुकानात घेऊन जाण्यासाठी दिली होती. त्याने दुकानात न जाता ते सोने घेऊन खासगी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरपर्यंत प्रवास केला. तेथून जीपने गावाकडे पलायन केले.
याबाबत संस्कार एन्टरप्रायजेस रिफायनरीचे मालक सिद्धेश्वर शिंदे यांनी बेंगलोर येथील विल्सन गार्डन पोलीस ठाण्यास फिर्याद दिली होती. त्यानंतर बेंगलोर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून खासगी वाहनाची दोन पथके स्वप्निल घाडगे याच्या मागावर होते. दरम्यान बेंगलोर पोलिसांनी सांगोला पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन मदत घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार कर्नाटक व सांगोला पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून चोरीतील स्वप्निल घाडगे यास धायटी (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले.
----
पोलिसी खाक्याने दिले दागिने परत
सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरीतील सुमारे ६ कोटी २६ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने काढून दिले. चोरीतील आणखी ८ लाख रुपयाचे सोने हस्तगत करणे बाकी आहे. या प्रकरणात सांगोल्यातील एका सराफावर संशय व्यक्त केला जात आहे. कर्नाटक पोलीस स्वप्निलला ताब्यात घेऊन बेंगलोरकडे रवाना झाले. कर्नाटक पोलीस पथक समवेत सहा. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या टीमने संयुक्तपणे ही कामगिरी केली.
ग्रामस्थांनी अडवले पोलिसांचे वाहन
कर्नाटक पोलिसांचे पथक खासगी वाहनाने चोरीतील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनांना रस्त्यावर दगड अडवून रोखले होते. यावेळी पोलिसांनी ओळख दाखवताच ग्रामस्थांनी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. या संपूर्ण प्रकरणाची सांगोला शहर व तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.