मोहोळ : दोघे मित्र दर्शनासाठी तुळजापूरला गेले... तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतले... त्यानंतर मंदिरासमोर उभे राहून सेल्फी काढले... हे सेल्फी स्टेटसला ठेवले. मात्र, त्यांचे ते सेल्फी शेवटचे ठरले... कारण तुळजापूरहून गावाकडे परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला... त्यात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला.
याबाबत मोहोळ पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश अनंता चवरे (वय २४, रा.पेनूर) व रमेश अशोक पाटकर (वय २२, रा. कुरुल) हे दोघे मित्र १४ सप्टेंबर रोजी तुळजापूरला गेले होते. तुळजापूरहून मंगळवारी रात्री गावाकडे दुचाकी क्रमांक (एमएच १३ डीके ४२११)वरुन येत होते. रात्री आठ वाजता त्यांची दुचाकी मोहोळ - पंढरपूर मार्गावरील पोखरापूर गावच्या शिवारात आली असता, समोरुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये नीलेश चवरे हा डोक्याला मार लागल्याने जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्याचा मित्र रमेश पाटकर हा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करत आहेत.
.....................
आठ महिन्यांपूर्वीच रमेशची पत्नी देवाघरी गेली
मुळचा कुरुल येथील रमेश पाटकर याचे वडील टेलरिंगचे काम करतात. रमेश हा त्यांचा दोन नंबरचा मुलगा होता. तो पुण्यात इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. दीड वर्षांपूर्वी रमेशचे लग्न झाले होते. परंतु, दुर्देवाने ८ महिन्यांपूर्वी गावाकडे आल्यानंतर त्याची पत्नी देवाघरी गेली होती. त्यातून सावरत रमेश हा आपला उद्योग सांभाळत होता. तो गावाकडे आल्यानंतर पेनूर येथील मामाकडे गेला होता. दरम्यान, पेनूर येथील त्याचा मित्र नीलेश चवरे याच्याबरोबर तो तुळजापूरला गेला होता. तेथून परत येताना ही दुर्देवी घटना घडली. तर पेनूर येथील नीलेश चवरे याला दोन भाऊ असून, नीलेश हा शेती करत होता.
........
(फोटो १५ मोहोळ २)