सोलापूर : कोरोना संसर्गाने भारतरत्न इंदिरा नगर येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सत्तर फूट रोड, कुमठा नाका आदी सील करण्यात आलेला परिसर तब्बल दोन महिन्यांनंतर खुला करण्यात आला आहे. कडकडीत बंद असलेल्या या भागातील दुकाने उघडण्यात आल्याने स्थानिक नागरिक व व्यापाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे शहरातील ४८१ ठिकाणी जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनपैकी ५० ठिकाणचे सील हटवण्यात आले आहेत.
१२ एप्रिल २०२० रोजी तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू कोरोनाने झाला. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. शहर पोलीस आयुक्तालयाने तत्काळ जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा परिसर सील केला व हा भाग कंटेन्मेंट एरिया म्हणून जाहीर झाला होता.
अवघ्या दोन दिवसात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार पेठ येथे मुंबई येथून आलेल्या पोलीस कर्मचाºयाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. हा परिसर देखील सील करण्यात आला होता. १९ एप्रिल रोजी भारतरत्न इंदिरा नगर येथे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अन् कुमठा नाका, सत्तर फूट रोड परिसरात खळबळ उडाली होती. हा परिसर देखील सदर बझार पोलिसांनी तत्काळ सील केला होता.
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत होती. शहरातील २७ भागात काही ठिकाणी १४ दिवस, २० दिवस तर काही भाग एक महिन्यासाठी सील करण्यात आला होता. या परिसरात बाहेरील व्यक्तीला आतमध्ये तर आतील नागरिकांना बाहेर सोडले जात नव्हते.
परिस्थिती पाहून कालांतराने एक एक भाग हा कंटेन्मेंट झोनमधून कमी करण्यात आला; मात्र भारतरत्न इंदिरा नगर, सत्तर फूट रोड व कुमठा नाका हा भाग १५ जूनपर्यंत सील होता. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशावरून दि.१६ जून रोजी परिसरातील कंटेन्मेंट झोन काढून टाकण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी केली होती मागणी- भारतरत्न इंदिरा नगर, सत्तर फूट रोड व कुमठा नाका परिसरातील लोक दोन महिने घरात होते. अत्यावश्यक सेवेतील दूध, रेशन व किराणा दुकानाची सेवा घरपोच केली जात होती. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले होते. स्थानिक नागरिकांनी हा कंटेन्मेंट झोन काढण्यात यावा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनाची दखल घेऊन हा कंटेन्मेंट झोन काढण्याचा निर्णय घेतला. दि.१६ जून रोजी झोन उठवण्यात आला अन् नागरिक घराबाहेर पडले. दुकानदारांनी आपली दुकाने उघडली, लोकांनी खरेदी करण्यास सुरुवात केली.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशावरून सत्तर फूट रोड, इंदिरा नगर, कुमठा नाका व अन्य परिसरातील कंटेन्मेंट झोन काढण्यात आला आहे. लावण्यात आलेले बॅरिकेड्सही काढले असून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत; मात्र नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी. संकट दूर झालेले नाही, संसर्गाने धोका वाढू शकतो.- बजरंग साळुंके, पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस ठाणे.