Good News; करमाळ्याच्या केळीची सातासमुद्री निर्यात; दररोज ५० कंटेनरची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:07 PM2019-11-18T13:07:11+5:302019-11-18T13:10:59+5:30
उसाला निवडला पर्याय: २५ गावांतील शेतकºयांचा वाढला ओढा, वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..
नासीर कबीर
करमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनीच्या लाभक्षेत्रात कंदर, वांगी, चिखलठाण, बिटरगाव-वां, कुगाव, वाशिंबे, केत्तूर, पोमलवाडी, सोगाव, हिंगणी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगाव, उम्रड आदी २५ गावशिवारातील शेतकरी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे उत्पादन घेऊ लागले असून, या भागात उत्पादित केळी सातासमुद्रापार चालली आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील पुनर्वसित शेतक ºयांनी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. उसाच्या गाळपासाठी शेतकºयाला प्रत्येक वर्षी कारखानदारांचे उंबरठे झिजवावे लागतात व उसाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करून आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ते टाळण्यासाठी शेतकरी केळीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडला तरी पुणे जिल्ह्यात पडणाºया पावसाने उजनी धरण शंभर टक्के भरते. त्याच्याच जोरावर उजनी पट्ट्यात केळीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात तीन हजार हेक्टर क्षेत्रात केळीचे उत्पादन घेतले गेले आहे. तालुक्यातून दररोज ५० ते ६० कंटेनर केळी विक्रीसाठी जात आहे. त्यामुळे ऊस पिकवणारा पट्टा आता केळीचे आगार म्हणून नावारुपाला येऊ पाहत आहे. करमाळा तालुक्यातून इराण, इराक,रशिया,जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात होत आहेत. विशिष्ट आकार व चवीची केळी उत्पादित होत असल्याने येथील केळींना मागणी आहे. केळी हे बाराही महिने चालणारे फळ असल्याने त्याला मोठी मागणी असते. करमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जेएनपीटीतून जहाजाने जातात.
वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..
वाशिंबे येथे केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, वाशिंबे शिवारात ५०० एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेत. शंकर निवृत्ती झोळ यांची केळी मलेशिया,इराण येथे निर्यात झालेली आहेत. शंकर झोळ यांनी तीन एकरात १०० टन उत्पादन घेतले आहे. युवराज झोळ, संजय शिंदे,रणजित शिंदे,भाऊ झोळ हे युवा शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. तालुक्यात सर्व प्रथम कंदरच्या शेतकºयांनी उसाला ब्रेक देऊन केळी पिकाकडे वळून निर्यातक्षम केळी तयार करून त्याची परदेशात विक्री केली. उसापेक्षा जास्त पैसा केळी पिकापासून मिळू लागल्याने युवा शेतकरी केळी पिकाकडे वळू लागले आहेत.