सोलापूर : घराच्यावर सारखा आवाज का येतोय हे पाहण्यासाठी जाफर बांगी आले. घराच्या पत्र्यावर त्यांना मुस्तकीम शेख हा पंधरावर्षीय मुलगा निदर्शनास आला. सत्तर फूट उंच अडकलेल्या पारवा पक्ष्याला वाचविण्यासाठी तो धडपडत होता. त्याच्या प्रयत्नाला अग्निशामक दल आणि पक्षीमित्रांची जोड मिळाली अन् काही वेळात पारव्याने आकाशात झेप घेतली.
ही घटना आहे सिद्धेश्वर पेठ परिसरातील यशोधरा रुग्णालय परिसरातील़ त्याचे असे झाले, शनिवारी पाडवा सणाची सर्वत्र तयारीची लगबग होती. अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या पूजेची तयारी सुरु होती. इतक्यात अग्निशामक दलाचा फोन खणखणला. ‘हॅलो़..मी जाफर बांगी बोलतोय.. बेगमपेठमध्ये यशोधरा हॉस्पिटलसमोरील रोडवर एक उंच तारेत मांजामध्ये पारवा पक्षी अडकला आहे’ हा संवाद ऐकताच अग्निशामक दलाच्या जवानांनी नववर्षाची पूजा थोडावेळ पुढे ढकलून दलाचे सहायक अच्युत दुधाळ, फायरमन नेताजी दराडे, नीलेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला सोडवताच साखरपाणी देण्यात आले. सुदैवाने त्याला कुठेही जखम झाली नव्हती. त्यानंतर तत्काळ निसर्गात सोडण्यात आले. पारव्याने क्षणात नववर्षाचे नवजीवन जगण्यासाठी निसर्गात झेप घेतली़
डोळे मिचकावत पारव्याने दिली स्माईल- पारवा जखमी झाला असेल त्यावर तत्काळ उपचार व्हावेत असा विचार करुन निघत असताना अग्निशमन दलाने वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे आणि पक्षीमित्र मुकुं द शेटे यांना फोनवरुन या घटनेची माहिती दिली. टीम घटनास्थळी दाखल झाली. केबल तारेला पतंगाचा मांजा अडकला होता. त्याचे दोन्ही पाय त्यात फसले होते़ तो उलटा लटकलेल्या अवस्थेत होता. बाजूच्या उंच इमारतीवर अग्निशमन टीमसह काशीद हत्तुरे, जावेद बांगी, शौकीब शेख, तन्वीर बांगी पोहोचले़ मुस्तकीम शेख हापण मागे-मागे मदतीला आलाच. त्याने सोबत लांब दोरी आणली होती. दोरीला दगड बांधून लोंबकळणाºया मांजामध्ये अचूकपणे अडकावले. सावकाश स्वत:कडे खेचले. पारवा हातात येताच त्याच्या अंगावर फसलेला सर्व मांजा काढण्यात आला. संकटातून सुटका झाल्याची त्याला जाणीव झाली. डोळे मिचकावत या पारव्यानेदेखील एक स्माईल दिली. त्यानंतर त्याने निसर्गात भरारी घेतली़