शिपायाने गंडविले शिक्षकाला; सोळा लाखांची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:43 PM2019-05-08T12:43:09+5:302019-05-08T12:44:30+5:30
नोकरीला लावतो म्हणून मागितले होते पैसे; सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल
सोलापूर : नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) येथे शिपाई व लिपिक पदावर नोकरी लावतो असे सांगून १६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी, शिपायाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्षकाने फिर्याद दिली आहे.
कैलास साहेबराव जाधव (रा. कमला नगर, बस स्टॉपसमोर घर नं.६४) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, आरिफ महंमद हनीफ पठाण (वय-४९ रा. १७७, शनिवार पेठ, भारतीय चौक) हे सिद्धेश्वर पेठ येथील पानगल प्रशालेत एनसीसी विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. आरिफ पठाण हे आॅगस्ट २0१७ मध्ये संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता येथील ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कामानिमित्त गेले होते. तेथे एनसीसीच्या कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेला कैलास जाधव याच्यासोबत ओळख झाली.
कालांतराने कैलास जाधव याने तो मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे सांगून, त्याची ओळख विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा विभाग पुणे येथे ओळख असल्याचे सांगितले. अनेक लोकांना पैसे घेऊन ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी (लष्कर) मध्ये शिपाई व लिपिक पदावर नोकरी लावली असल्याचे सांगितले.
काही दिवसानंतर संगमेश्वर महाविद्यालयात भेट झाल्यानंतर कैलास जाधव याने आरिफ पठाण यांना तुमच्या मुलास नोकरी लावायची का? असे विचारून त्यासाठी १0 लाख रुपये लागतील असे सांगितले. आरिफ पठाण यांनी घरी चर्चा करून मुलगा अरबाज आरिफ पठाण याला नोकरी लावण्याचा निर्णय घेतला. आरिफ पठाण यांनी बँकेतून पीएफचे ७ लाख २५ हजार रुपये काढले. घराच्या वर राहणाºया भाडेकरूकडून ५ लाख रुपये घेतले.
७ ते १४ सप्टेंबर २0१७ दरम्यान श्रीनिवास पिल्ले यांच्या सोबत जाऊन कैलास जाधव याला १0 लाख रुपये दिले. कैलास जाधव याने एक महिन्याच्या आत मुलाची लिपिकपदाची आॅर्डर आणतो असे सांगितले. एक महिन्यानंतर विचारणा केली असता क्रीडा व युवा सेवा पुणे विभागाचे उपसंचालक विजय संतान हे कामात आहेत थोड्या दिवसात आॅर्डर आणतो असे सांगितले.
काही दिवसांनी कैलास जाधव हा कामावर येत नसल्याचे लक्षात आले. आरिफ पठाण यांनी चौकशी केली असता तो २६ ते २९ मार्च २0१८ दरम्यान रजेवर असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरिफ पठाण यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आणखी एकाकडून घेतले सहा लाख रुपये...
- एनसीसीच्या कार्यालयात शिपाई पदावर नोकरी लावतो असे सांगून कैलास जाधव याने दत्तात्रय लांबतुरे यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले होते. दत्तात्रय लांबतुरे यांचा मेव्हुणा स्वप्निल ज्ञानेश्वर पांडव यास नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. दोघांची फसवणूक झाल्याने फिर्याद दाखल करण्यात आली आहे.