भाजपचे दरवाजे उघडले तर शरद पवार, चव्हाणांशिवाय कोणीच उरणार नाही - शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:34 AM2019-09-02T06:34:27+5:302019-09-02T06:34:52+5:30
महाजनादेश यात्रेचा समारोप; महाडिक, गोरे, राणा पाटील यांचा प्रवेश
सोलापूर : काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने आजपर्यंत फक्त घराणेशाही जोपासली. मुलगा, मुलगी, पुतण्या यांचेच भले झाले आहे. जलसिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. आदर्श घोटाळ्यामुळे सैनिकांचे नुकसान झाले. भाजपचे दरवाजे आम्ही थांबविले आहेत. जर उघडले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी सोलापुरात केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूरच्या पार्क मैदानावर झाला. यावेळी माण-खटावचे कॉँग्रेस आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि उस्मानाबादचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी नेते उपस्थित होते.
अमित हा यांनी भाषणात राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, जम्मू- काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर काँग्रेसचे खा. राहुल गांधी, शरद पवार हे टीका करीत आहेत. देश हिताच्या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे होते; मात्र काँग्रेस विरोध करीत आहे. राहुल गांधी यांच्या विधानांचा वापर पाकिस्तान करीत आहे, यामुळे महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीपूर्वी या पक्षांनी काश्मिरमधील ३७० कलमाबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे, असे आव्हानही शहा यांनी दिले.
पोरं भाजपमध्ये जात आहे, या शरद पवार यांनी केलेल्या टिकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, उदयनराजे, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक ही मंडळी काय पोरं आहेत का? उगी काही बोलू नका. या मंडळींना येत्या विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे हे माहिती आहे. संपूर्ण विचाराअंती त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ज्यांना असे वाटत असेल त्यांनी लक्षात घ्यावे.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण पूर्ण करणार : मुख्यमंत्री
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंत पाटील यांना काय समजते? गेल्या मंत्रिमंडळात डझनभर मंत्री पश्चिम महाराष्टÑाचे होते, परंतु त्यांनी काय केले? आम्ही या भागातील सगळे प्रकल्प पूर्ण करू. भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प पूर्ण करू. या भागातील पाणी मराठवाड्याला नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड आणला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन् सोलापुरात जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असं कसं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.