सोलापूर : युट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने नवीन गॅस कटर विकत घेऊन एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. आकाश महादेव उडानशिवे (वय २३, रा. देवनगर सोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीकडून विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील चार घरफोड्या उघडकीस आल्या असून, यातून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी आकाश हा अल्पशिक्षित असून, त्याच्यावर पुण्यामध्ये दुचाकी चोरी आणि शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत सातपेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपी आकाश जुना विजापूर नाका येथून संशयितरीत्या जात असताना विशेष पथकाच्या पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याजवळ गॅस कटर व इतर नवीन साहित्य आढळले. यामुळे त्याची विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यानंतर त्याने विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रोहिनी नगर, सैफुल, सहारा नगर, ब्रह्मदेव नगर, आशीर्वाद नगर या चार ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील ३७ तोळे सोन्याचे ऐवज, १५३ ग्रॅम चांदीचे दागिने, १३ हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. आरोपी पुढील काहीच दिवसांत एटीएम फोडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस हवालदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजिद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी केली.
चोरीच्या पैशातून ब्रँडेड कपडे
ज्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, शेजाऱ्यांचे एकमेकांच्या घरांवर लक्ष नाही किंवा सुरक्षिततेचा अभाव असणाऱ्या घरांच्या शोध घेऊन आकाश उडानशिवे हा त्या घरात चोरी करत असे आणि चोरी केलेल्या पैशातून तो ब्रँडेड कपडे, चैनीच्या वस्तू खरेदी करत होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.
दागिने विकत घेणाऱ्या सोनाराची होणार चौकशी
चोरी केलेल्या गुन्ह्यातील दागिने त्याने सोरेगाव येथील एका सोनाराला दुसऱ्यांच्या मदतीने विकले. दरम्यान, त्या सोनाराकडून सोने जप्त केले असून, त्या सोनाराची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.