धक्कादायक; रात्री आईच्या कुशीतून बाळ झाले गायब...सापडले पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 12:43 PM2021-11-11T12:43:04+5:302021-11-11T12:43:22+5:30
मंगळवेढा चाळीतील प्रकार : फौजदार चावडी पाेलीस ठाण्यात नोंद, चौकशी सुरू
सोलापूर : मुरारजी पेठेतील मंगळवेढा चाळीत एका घरातील अवघ्या २५ दिवसांचे पुरुष जातीचे बाळ रात्री अचानक आईच्या कुशीतून गायब झाले. शोधाशोध केली असता ते मिळून आला नाही, शेवटी घराबाहेर असलेल्या पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले.
हा प्रकार बुधवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आला. प्रतीक्षा संकेत सुरवसे (वय २०) यांना २५ दिवसाचा एक मुलगा होता, त्याला रात्री नेहमीप्रमाणे कुशीत घेऊन त्या झोपल्या होत्या. सकाळी पती संकेत सुरवसे उठले तेव्हा त्यांना पत्नीजवळ मुलगा नसल्याचे दिसून आले. संकेत यांनी पत्नी प्रतीक्षा यांना उठवले व मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली तेव्हा त्याही घाबरल्या. घरातच मुलाचा इतरत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही दिसून आला नाही. संकेत हे पाणी घेण्यासाठी घराच्या बाहेर गेले. हांडा ड्रममध्ये बुडवत असताना त्यांना आत त्यांचे बाळ आढळून आले. संकेत यांनी तत्काळ बाळाला बाहेर काढले, तेव्हा ते बेशुद्ध पडल्याचे दिसले. बाळाला तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेव्हा बाळ मरण पावल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी होता नामकरण विधी
- ० प्रतीक्षा सुरवसे यांना पहिला मुलगा एक वर्षाचा आहे. त्याचा पहिला वाढदिवस गुरुवारी तर २५ दिवसाच्या बाळाचा नामकरण विधी बुधवारी होणार होता. नामकरणाच्या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. पाहुणेदेखील आले होते, मात्र अचानक हा प्रकार घडल्याने चाळीत खळबळ उडाली आहे.
- ० बाळाचे वडील संकेत सुरवसे हे एका खासगी मॉलमध्ये कामाला आहेत. पत्नी प्रतीक्षा ही घरकाम करते. हा धक्कादायक प्रकार घडला कसा, कोणी केला, याचे काय कारण आहे, या सर्व गोष्टी अस्पष्ट आहेत.
- ० पोलिसांनी चौकशीसाठी बाळाची आई, वडील, आजी व आत्या यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बोलावले होते.
- ० २५ दिवसांच्या बाळाचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचे आई-वडील व नातेवाइकांनी त्याचा मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला.
बाळाला पाण्यात टाकले कोणी?
० २५ दिवसांच्या बाळाला आईच्या कुशीतून घेतले कोणी आणि बाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकले कोणी, असा प्रश्न स्थानिक नागरिक व पोलिसांना पडला आहे. वास्तविक पाहता बाळाला पाण्यात टाकून त्याचा खून करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत असून, लवकरच याचा छडा लावला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.