सोलापूर : महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी हैदराबाद येथून सप्तरंगी मकाऊ पोपटांची नर-मादी आणली होती. यासाठी महापालिकेने तीन लाख रुपये खर्च केले होते. या पक्षांच्या जोडीचा सिद्धेश्वर वनविहारात मृत्यू झाला.
मकाऊ पोपटाच्या जोडीतील एका पक्षाचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी, तर दुसऱ्या पक्षाचा मृत्यू रविवारी झाला. मृत पक्षांना मुंग्या आणि किडे लागले आहेत. मागील दोन वर्षांपासून श्री सिद्धेश्वर वनविहारात असणाऱ्या या पक्षांचे हाल होत असून त्यांना तेथून हलविण्यात विनंती केली होती. त्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे तीन लाख रुपये खर्च करून आणलेल्या पक्ष्याचा मृत्यू झाल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण संचालक समितीने २०१९ मध्ये महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची वार्षिक तपासणी केली होती. या तपासणीत त्रुटी काढत विदेशी मकाऊ पक्ष्यांना वेगळे ठेवण्याची सूचना केली तेव्हापासून हे पक्षी सिद्धेश्वर वनविहार येथील लहानशा पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
मकाऊ २०१६ पासून सोलापुरात
मकाऊ पक्षांना तीन ऑगस्ट २०१६ मध्ये सोलापुरात आणण्यात आले होते. या पक्षांचे खाद्य हे बदाम, पिस्ता, आक्रोड यासारखा टणक टरफल असलेला सुका मेवा आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना पक्षांना फळे देण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून पक्षांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणून अखेर त्या पक्षांचा मृत्यू झाल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.