सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारातील बंदेनवाज दर्गाह लगत असलेल्या वनविभागाच्या बांधकामालगत खून करून टाकलेल्या महिलेचे प्रेत स्वत:च्या पत्नीचे असल्याचा गैरसमज करून पतीने अंत्यविधी केला. प्रत्यक्षात ती जिवंत असल्याने पतीसह नातेवाईकाचा गोंधळ उडाला.
बोरामणी गावच्या शिवारात दि. १९ सप्टेंबर रोजी एका ३० ते ३५ वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा कशाने तरी गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; मात्र ३ ते ४ दिवसांपूर्वी खून झाल्याने ते ओळखू येत नव्हते. मृतदेहाच्या अंगावर कपडेही नव्हते. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मिसिंग महिलांची माहिती घेण्यास सुरुवात केली. वळसंग पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी एका महिलेची मिसिंग दाखल झाली होती. संबंधित महिलेच्या पतीला व भावाला तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बोलावून घेतले. मिसिंग महिलेच्या भावाने खून झालेली महिला माझी बहीण आहे असे सांगितले. तसे प्रतिज्ञापत्रही तालुका पोलीस ठाण्यात दिले. त्यानंतर मृतदेह घेऊन जाण्याच्या स्थितीत नसल्याने तत्काळ भाऊ, मिसिंगची तक्रार देणारा पती व अन्य नातेवाईकांनी सोलापुरातील स्मशानभूमीत अंत्यविधी केला.
अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाईक व पोलीस मोकळे झाले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तांत्रिक विश्लेषणावरून माहिती मिळाली की वळसंग पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असलेली महिला ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे राहत आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जाऊन खात्री केली असता मिसिंग झालेली महिला तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये राहात होती. तिला तत्काळ वळसंग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खरीखुरी पत्नी पतीसमोर तर बहीण भावासमोर उभी केल्यानंतर नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. गैरसमजातून आम्ही दुसऱ्याच महिलेचा अंत्यसंस्कार केल्याची कबुली नातेवाईकांनी दिली.
पुन्हा पोलिसांनी लावला डोक्याला हात
० बोरामणी येथे खून करून टाकण्यात आलेली महिला कोण? असा प्रश्न प्रथमत: पोलिसांना पडला होता. शोध घेतल्यानंतर तिचे नातेवाईक मिळून आले, अंत्यसंस्कार झाला. आता फक्त खुनाचा तपास करायचा होता. मात्र जेव्हा अंत्यसंस्कार झालेली महिला दुसरीच निघाली तेव्हा पोलिसांनी पुन्हा डोक्याला हात लावला. आता जिचा अंत्यसंस्कार झाला ती महिला कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. खून झालेली बेवारस महिला काेण याचा तपास लागेल तेव्हा लागेल मात्र तिचा अंत्यसंस्कार थोड्या वेळासाठी का होईना नसलेल्या नातेवाईकांच्या हस्ते झाला.
मृतदेह ओळखू येत नसल्याने नातेवाईकांचा गैरसमज झाला. त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन मृतदेह ताब्यात घेतला अन् अंत्यसंस्कार केला, मात्र मिसिंग महिला जिवंत आहे. मृत महिलेचा तपास सुरू आहे, लवकरच शोध लागेल.
प्रवीण संपांगे, सहायक पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन