सोलापूर : अयोग्य जीवनशैली, कामाची पद्धती यामुळे अनेकांना रक्तदाबासह गंभीर आजारांची लागण होत आहे. मागील काही वर्षांपासून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांपेक्षा पुरुषांना जास्त टेन्शन असल्याचे राष्ट्रीय कुटुंब अहवालातून समोर आले आहे.
अतिगंभीर स्वरूपातील रक्तदाब, ज्यावर औषधी घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे. सोलापुरातील पुरुषांमध्ये याचे प्रमाण २६.२ टक्के, तर महिलांमध्ये २५.७ टक्के इतके आहे.
रक्क्तदाबाचा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यामुळे हृदय, किडनी, मेंदू आदी महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. या समस्या टाळण्यासाठी रदाबावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्यावी?
जास्त वेळ एका ठिकाणी बसू नये. थोडा वेळ उठून पाय मोकळे करावेत किंवा थोडी शारीरिक हालचाल करावी. जिथे जिथे आपल्याला पायी चालण्याची संधी मिळते, तिथे पायी चालावे. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा. जास्तीत जास्त घरकामे स्वत: करावीत. नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे. विपश्यना, ध्यानधारणा करणे.
रक्तदाब वाढण्याचे कारण
वाढते वय, आनुवंशिकता, अयोग्य आहार, कमी शारीरिक हालचाली, लठ्ठपणा, जास्त दारूचे सेवन, तणाव आदी कारणांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
मीठ खा कमी..
रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. दररोज व्यायाम व ध्यानसाधना करावी. चाळिशीनंतर चरबीयुक्त अन्नाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रज्ञेश पानशेवडीकर, सहायक वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रग्णालय