सोलापूर : आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना गाडी थांबवता यावी, यासाठी मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या ६९० दिवसांत किरकोळ कारणांसाठी साखळी खेचण्याच्या १४९ घटना घडल्या असून, त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत जवळपास २३ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांची नोंद रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ पोलिसात करण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे मेल-एक्स्प्रेसमधील असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विनाकारण साखळी खेचणाऱ्या प्रवाशांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे, तर काहींना शिक्षाही करण्यात आली आहे.
---
काय आहे शिक्षा
रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४१ नुसार विनाकारण साखळी ओढल्याने पकडले गेल्यास जास्तीत जास्त एक हजार रुपये दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. साधारणपणे दंडाधिकारी केवळ ५०० रुपये दंड भरून आरोपीला सोडतात. हा दंड न भरल्यास केवळ नाममात्र प्रकरणांमध्ये एक महिना कारावास भोगावा लागतो.
----
चेन खेचण्याचा घटना
एक्स्प्रेस पकडताना एखादा मित्र किंवा नातेवाईकाला काही कारणास्तव डब्यात प्रवेश न मिळणे, फलाटावर सामान विसरणे, चुकीची गाडी पकडल्याने पुन्हा दुसऱ्या स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे, ठराविक स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे अशा किरकोळ कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
---
वेळापत्रक बिघडत असल्याने गाड्या विलंबाने
साखळी खेचल्याने मेल-एक्स्प्रेस गाडी त्याठिकाणीच उभी राहते. ज्या डब्यातून साखळी खेचली आहे, तेथे गार्ड किंवा पोलीस तसेच स्टेशन मास्तर जाऊन पाहणी करतात. त्यानंतर असलेली समस्या सोडवून गाडी पुढे जाण्यासाठी हिरवा कंदील देतात. परंतु, यामुळे त्या रेल्वेगाडीच्या आणि त्यामागोमाग असलेल्या अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. यामुळे गाड्या विलंबाने धावतात.
---
‘मेल-एक्स्प्रेसमध्ये क्षुल्लक कारणासाठी साखळी खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. आगामी काळात अशाप्रकारच्या घटना कमी करण्यात येतील, शिवाय विनाकारण साखळी खेचणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
---