सोलापूर : सोलापूर - तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील एका हॉटेलच्या व्यवस्थापकाचा डोक्यात कुदळ घालून खून केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. खून केल्यानंतर व्यवस्थापकाचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडाखाली पुरण्यात आला होता.
कैलास आप्पानाथ परबळकर (वय ५० रा. शाहीर वस्ती भवानी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. कैलास परबलकर हे हॉटेल सौरभ या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सात महिन्यापूर्वी या हॉटेलमध्ये आकाश मंडल नावाचा पश्चिम बंगाल येथील व्यक्ती वस्ताद म्हणून कामाला लागला होता.
२३ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन लागल्यामुळे हॉटेल बंद होते. बंद काळात आकाश मुंडुल हा हॉटेलमध्ये एकटा राहत होता. दिनांक १३ जून रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने हॉटेलला परवानगी दिल्यानंतर हॉटेल पुन्हा सुरू झाले होते. मात्र हॉटेलमध्ये जेवण विभाग हा बंद करण्यात आलेला होता, त्यामुळे दारूची पार्सल सोय करण्यात आलेली होती. पार्सलची सोय झाल्यामुळे हॉटेलचे व्यवस्थापक कैलास परळकर हे हॉटेलमध्ये पुन्हा कामाला येत होते. काही दिवसापासून ते रात्री हॉटेलमध्येच मुक्काम करत होते. शनिवारी रात्री व्यवस्थापक कैलास परबलकर व वस्ताद कैलास मुंडुल हे दोघे जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी दहा वाजता साफसफाई करणारा कर्मचारी कामाला आला, तेव्हा त्याला समोरून हॉटेल बंद असल्याचे दिसून आले. त्याने हॉटेलच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहणी केली असता दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता आतमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे कामगाराने हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोन करून माहिती दिली. हॉटेलमध्ये कोणी नसल्याचे समजतात मालक राजू गुल्लापल्ली हे हॉटेलमध्ये आले. त्याने सर्वत्र पाहणी केली असता एका वस्तूवर त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्यांना काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय आला. राजू गुल्लापल्ली यांनी हॉटेलच्या पाठीमागील परिसरात फिरून पाहणी केली असता त्यांना झाडाखाली जमिनीतून दोन पाय वर आलेले दिसले, त्यांनी तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हॉटेलचे व्यवस्थापक कैलाश परबलकर यांचा मुलगा आकाश परबळकर याला बोलावून घेतले. उरलेले प्रेत बाहेर काढल्यानंतर मुलाने ते प्रेत वडीलांचे असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.