धक्कादायक; चुलत्याच्या दशक्रिया विधीसाठी गेला अन् पाण्यात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 05:12 PM2022-08-17T17:12:15+5:302022-08-17T17:12:51+5:30
ताईंचा आक्रोश: पाकणीत सीना नदीच्या पात्रात पाय घसरुन मृत्यू
सोलापूर : चुलत्याच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या पुतण्यावर काळाने घाला घातला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह पाकणी येथील सीना नदीच्या पात्रात आढळला. ही वार्ता समजताच नातलगांनी सिव्हील परिसरात जमून एकच हंबरडा फोडला. एकुलता, एक भाऊ गमावल्याने बहिणींनी सिव्हील हॉस्पिटल परिसरात हंबरडा फोडला.
यातील मयत किशोर दिगंबर व्हटकर हा २०१६पासून शासकीय रुग्णालयात सेवक म्हणून कार्यरत होता. अतिशय मितभाषी म्हणून त्याची ओळख होती. जमा वस्ती, भवानी पेठ येथे तो वास्तव्याला होता. चुलत्याचे निधन झाल्याने दशक्रिया विधीसाठी सोमवारी, १५ ऑगस्ट रोजीे तो नातलगांसह पाकणी येथील नदीच्या पात्रावर गेला होता. दशक्रिया विधी सुरु असताना अचानक त्याचा पाय घसरला. यातच तो बुडाला. बरीच शोधाशोध करुन तो सापडला नाही.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचा देह बेशुद्धावस्थेत मिळून आला. नातलगांना खबर देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबामध्ये एकच हलकल्लोळ माजला. सिव्हील परिसरात जमलेल्या किशोरच्या बहिणी, नातलगांचा शोक अनावर झाला. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.
-----
एकुलता एक भाऊ गेला
मयत किशोर याला विजया नारायणकर ही मोठी बहीण आणि वर्षा कोकणे या दोन बहिणी होत्या. तो एकुलता एक भाऊ होता. यातील विजया या मुंबईला घाटकोपर येथे असतात, दुसरी बहीण वर्षा ही अणदूर (ता. तुळजापूर) येथे सासरी असते. चुलत्याच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्या सोलापुरात आल्या होत्या. चुलत्यापाठोपाठ पाठचा भाऊही गेल्यामुळे त्यांचा शोक अनावर झाल्याचे दिसून आले.
----
बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचं बोलावणं
- किशोर शासकीय रुग्णालयात सात वर्षांपासून सेवक होता. अत्यंत मनमिळावू, नेहमी प्रसन्न चेहरा आणि कामात हुशार होता. त्याचे लग्नही झाले नव्हते. बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला काळानं बोलावलं, अशा शब्दात विजया, मानलेली बहीण सावित्रीबाई वाघमारे यांनी दु:ख व्यक्त करीत हंबरडा फोडला. -----