ओलीमुळे फडात वाहन अडकले
मोहोळ : सध्या सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू झाला आहे. ऊसतोड मजूर आणि मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी सुरू आहे, परंतु उसाच्या फडात आणि आडवाटेवरही ओल आहे. त्यामुळे वाहनात ऊस भरल्यानंतर ते जागेवर रुतत आहेत. त्यामुळे त्या वाहनाला काढण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी या वाहनांना बोलवावे लागते. ते आल्यानंतर त्यांनाही ठराविक रक्कम द्यावी लागते. त्याचा खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागत असल्याचे चित्र आहे.
खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस तालुक्यातील कारखान्याला तर जातोच, याशिवाय बाहेरील तालुक्याला गाळपासाठी जात आहे. शेतापासून कारखान्यापर्यंत वाहतूक करताना अनेक ठिकाणी खड्डे पडलेले रस्ते असतात. त्यात भरलेले वाहन हेलकावे मारल्याने उसाच्या मोळ्या पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ
अक्कलकोट : कोरोना काळात सर्वच मंदिरे बंद होती; मात्र शासनाने मंदिरे खुले करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली. त्यानंतर अक्कलकोट स्वामी समर्थ, गौडगावचे मारुती मंदिर, गाणगापूर श्रीदत्त मंदिर हे खुले झाले आहेत. शासकीय नियमांचे पालन करून भाविक दर्शन घेत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच मंदिरात भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.