श्री पांडुरंग पालखीचे आळंदीला प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:03 AM2019-11-13T05:03:30+5:302019-11-13T05:03:34+5:30
टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे १५ हजार वैष्णवांसह श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
पंढरपूर (जि़सोलापूर): टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे १५ हजार वैष्णवांसह श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी या २५ दिवसांच्या श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे़ संत नामदेवांचे वंशजांच्या वतीने श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा आळंदीला जातो़ श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे हे यंदा सहावे वर्ष आहे.
श्री पांडुरंग पादुकांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रारंभी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सोहळ्याचे अधिपती ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर आदी उपस्थित होते. मंदिरातील मुख्य मंडपातून पालखी खांद्यावर घेऊन ती नामदेव पायरी प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तुकाराम भवन, चौफाळा, नाथ चौकमार्गे पुढे मार्गस्थ झाली़ सायंकाळी हा सोहळा भंडीशेगाव मुक्कामी पोहोचला.
>गोपाळ काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता
कार्तिकी यात्रेची सांगता मंगळवारी गोपाळ काल्याने झाली. गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात संत नामदेव महाराज, अंमळनेरकर महाराज, बापूसाहेब देहूकर महाराज, वासकर महाराज यांच्यासह विविध दिंड्या सकाळी लवकर मंदिराच्या ठिकाणी दाखल झाल्या. याठिकाणी काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.