सिद्धेश्वर यात्रा : हजार भक्तांना विधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मागणार परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:40+5:302020-12-11T13:14:53+5:30
सोलापूर : सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, नंदीध्वजधारक व यात्रेचे प्रमुख मानकरी यांची गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत ...
सोलापूर : सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, नंदीध्वजधारक व यात्रेचे प्रमुख मानकरी यांची गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. गेल्या ९५० वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धेश्वरांची यात्रा यंदा धार्मिक विधींसह साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेतील चार दिवस होणाऱ्या मुख्य धार्मिक विधीसाठी आवश्यक असलेले नंदीध्वजधारक, सेवेकरी, मानकरी असे दररोज एक हजार भक्तांना उपस्थित राहण्याची परवानगी मागण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. त्याबाबतचा आढावा शुक्रवारी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
.....
सिद्धेश्वर मंदिरातील पंच कमिटीच्या कार्यालयात अध्यक्ष धर्मराज काडादी, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आलेल्या बैठकीत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, भीमाशंकर पटणे, आर. एस. पाटील, चिदानंद वनारोटे, शिवकुमार पाटील, मल्लिकार्जुन कळके, मानकरी मल्लिनाथ मसरे, जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, बसवराज सावळगी, बाळासाहेब कुमठेकर, बसवराज भीमदे, सुधीर थोबडे, प्रकाश बनसोडे, मारुती बनसोडे, ओंकार बनसोडे उपस्थित होते.
.........
धार्मिक विधीसाठी हजार भक्तांना उपस्थित राहण्याची मागणार परवानगी
प्रारंभी राजशेखर हिरेहब्बू यांनी यात्रेत धार्मिक विधी आणि मिरवणुकीत सामील होणारे पंचरंगी झेंडे, वाजंत्री, बैलगाडी, भगवा झेंडा, संबळ, कावड, पालखी, नंदीध्वजधारक अशा भक्तांची संख्या सांगितली. त्याच अनुषंगाने येण्णीमज्जन, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, शोभेचे दारूकाम या चार महत्त्वाच्या धार्मिक विधींसाठी दररोज हजार भक्तांना धार्मिक विधीच्या मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी प्रशासनाकडे मागण्याचा ठराव करण्यात आला.
--
यंदा सर्वच विड्याच्या मानकऱ्यांना विडे न देता प्रातिनिधिक स्वरूपात देऊन गर्दी टाळता येते. गर्दीमुळे संपूर्ण यात्रेवर बंदी येण्यापूर्वी गर्दी कमी करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचा आदर करीत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
- ॲड. मिलिंद थोबडे
---
यात्रेतील सर्व धार्मिक विधींची सविस्तरपणे माहिती देऊन प्रत्येक विधीसाठी लागणाऱ्या भक्तांची संख्या निश्चित करण्यात आली. प्रत्येक नंदीध्वजासोबत १०० भक्तगण पालखी व इतर कार्यासाठी ३०० असे एक हजार भक्तगण या यात्रेत सामील होतील, तशी विनंती करणार आहोत
- राजशेखर हिरेहब्बू
यात्रेचे प्रमुख मानकरी