पोटनिवडणुकीत बहुरंगी लढती होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:00+5:302021-04-02T04:23:00+5:30
निवडणूक जाहीर होईपर्यंत शांत असलेल्या या मतदार संघात शेवटच्या टप्प्यात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत गेल्यामुळे या पोटनिवडणूकीची राज्यभर ...
निवडणूक जाहीर होईपर्यंत शांत असलेल्या या मतदार संघात शेवटच्या टप्प्यात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत गेल्यामुळे या पोटनिवडणूकीची राज्यभर चर्चा रंगली आहे. स्थानिक राष्ट्रवादीतील मतभेदांवर तोडगा काढत महाविकास आघाडीकडून दिवंगत आ. भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून इच्छुकांची मोठी संख्या असतानाही त्यांनी प्रमुख दोन दावेदार आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्यात समेट घडवत आवताडे यांना उमेदवारी दिली. प्रारंभी एकतर्फी व सोप्या वाटणाऱ्या या पोटनिवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे.
महाविकास आघाडीचा घटकपक्ष आसलेल्या शिवसेना व स्वाभिमानी आघाडी सोबत राहतील असे वाटत असताना त्या पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर सेनेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन बडतर्फ केले आहे. त्यामुळे त्या या निवडणुकीत असणार हे स्पष्ट झाले आहे.
सचिन शिंदे यांना स्वाभिमानीकडून एबी फॉर्म दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. हे चार प्रमुख उमेदवार रिंगणात असलेतरी परिचारक समर्थक नागेश भोसले, समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे, अभिजित बिचकुले यांच्या शिवाय वंचित बहूजन आघाडी, एमआयएमचे उमेदवारही निवडणूक मैदानात असल्याने ही निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
---------
गणित बिघडवणार...
या निवडणुकीत भाजपा व महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल असे संकेत होते. दोन्ही बाजूनी तसे प्रयत्न ही सुरू होते. मात्र शिवसेनेच्या शैला गोडसे व स्वाभिमानी चे सचिन शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत आघाडीला धक्का दिला आहे. तर भाजपाकडून आ. परिचारकसमर्थक माजी नगराध्यक्ष नागेश भोसले व समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. हे चारहीजण कोणाचे विजयाचे गणित बिघडवणार याबाबत रोज वेगवेळ्या चर्चा घडत आहेत.
----
भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर आवताडेंची मोहिते- पाटलांवर
निवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मूदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भाजपासाठी डोकेदुखी ठरणारे अपक्ष उमेदवार नागेश भोसले यांचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी आ. प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्यावर आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी मोहितेपाटील पिता-पूत्रावर जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पडद्याआड रोज बैठकांचे सत्र सुरू आहे.
----