सोलापूर : वने, निसर्ग अन् पक्ष्यांना आपल्या साहित्याचे नायक करून मराठी सारस्वतांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चित्तमपल्ली यांचे कायमच्या वास्तव्यासाठी सोलापुरात आगमन झाले असून, विदर्भातील जंगलात राहून सुरू केलेले वृक्षकोषाचे लेखन ते सोलापूर सिध्देश्वर तलावाच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात बसून पूर्ण करणार आहेत. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आवर्जून हे सांगितले.
सोलापुरात झालेल्या ७९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. भूमिपुत्रालाच हा मान मिळाल्याबद्दल सोलापूरकरांनी त्यावेळी आनंद व्यक्त केला. संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वृक्षवल्लींना सगेसोयरे मानून अखंड साधना करून लेखन केलेला हा निसर्गऋषी कायमच्या वास्तव्यासाठी सोलापुरी येणार असल्याने शहरवायीय आनंदी झाले आहेत.
अक्कलकोट रस्त्यावरील त्यांचा पुतणा श्रीकांत चितमपल्ली यांच्या घरी मारुती चितमपल्ली हे राहणार आहेत. नोकरीनिमित्त १९६० साली मारुती चितमपल्ली हे सोलापूर सोडले. साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने २००७ मध्ये ते काही दिवस सोलापुरात राहिले. ते पहिल्यांदाच येथे येत आहेत. चित्तमपल्ली म्हणाले, आत्ता नव्वदीत पोहोचलो आहे. मी एकटा आहे. आयुष्याचा शेवट माझ्या कुटुंबीयांसोबत घालवावा, याच इच्छेपोटी मूळगावी येत आहे.
वृक्षकोषाचे काम अपूर्ण राहिले आहे. ते सिध्देश्वर तलावाच्या काठावर बसूनच पूर्ण करेन. सोलापूरकडे येण्यापूर्वी नागपूर तसेच वर्धा या ठिकाणी मारुती चित्तमपल्ली यांचा निरोपपर सत्कार कार्यक्रम झाला. नांदेड या ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्यांनी निरोपपर मोठा सत्कार केला.सोलापुरी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार!मारुती चितमपल्ली म्हणाले, सोलापुरातील जुन्या मित्रांना भेटणार आहे. सध्या पथ्यपाणी सुरू आहे. यामुळे सोलापुरातील सोलापुरी खाद्यान्नाचा आस्वाद घेता येणार नाही. येथील सिद्धेश्वर मंदिर, शुभराय महाराज मठ तसेच दत्त मंदिर आदी ठिकाणी जायची इच्छा आहे. भटकंती कमी करेन. वृक्षकोशाबरोबरच मत्स्यकोश पुस्तकाचे लिखाण पूर्ण करणार आहे.