पोलीस सूत्रांनुसार शिवणे गावात सांगोला रोडवर प्रताप पाटील यांच्या शॉपिंग सेंटरमध्ये अक्षय त्रिंबक पाटील यांचे कापड दुकान आहे, तर त्यांच्याप्रमाणे संतोष जानकर यांचे हार्डवेअर, बाळासो देवळे यांचे संजीवनी मेडिकल, निसार काझी यांचे इलेक्ट्रिक दुकान, औदुंबर काळे यांचे सिमेंट दुकान तर अशोक घाडगे यांचे विश्वतेज किराणा दुकान अशी सलग दुकाने आहेत.
१३ ऑगस्टपासून संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापने बंद आहेत, हीच संधी साधून चोरट्यांनी कार्यभाग साधला. यामध्ये कपड्याच्या दुकानातून ६ हजार ४०० रुपयांचा माल तर संतोष जानकर यांच्या दुकानातून ६ हजारांची रोकड, सचिन देवळे यांच्या मेडिकलमधून ५०० रुपयांची चिल्लर, निसार काझी यांच्या इलेक्ट्रिक दुकानातून रोख ३ हजार, औदुंबर काळे यांच्या दुकानातून ३५० रुपये, अशोक घाडगे यांच्या किराणा दुकानातून ५ हजार रुपयांचा किराणा व काउंटरमधील रोख ३ हजार असा एकूण २४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. हा प्रकार बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आला. याबाबत अक्षय पाटील (रा.हलदहिवडी) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
----