सोलापूर : परदेश दौºयावरून परतल्यानंतर शासकीय रुग्णालयात निगराणीखाली ठेवलेल्या पाच रुग्णांपैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले असून, इतर चार जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याने त्यांना रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
परदेश दौºयावरून परतलेल्या पाच जणांना १४ मार्च रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परदेश दौºयावरून परतल्यानंतर लक्षणे आढळल्याने त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पाचही संशयितांचे स्वॅप तपासणीसाठी राष्टÑीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. १४ मार्च रोजी गेलेला अहवाल प्रयोगशाळेने तपासून पाठविला आहे. ‘तो’ रुग्ण निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यावर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. घरीच १४ दिवस राहण्याबाबत त्या रुग्णास सांगण्यात आले आहे. इतर चौघांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
कलबुर्गीवरून आणलेल्या ‘त्या’ २० विद्यार्थ्यांना सोमवारी घरी पोहोच करण्यात आले आहे. हे विद्यार्थी वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अहमदनगर, पालघर व पुण्यातील होते. या सर्वांना खास एसटी बसमधून मंडल अधिकारी व पोलिसांमार्फत घरी जाऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सायंकाळी चंद्रपूर येथील विद्यार्थी पोहोचले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची तब्येत चांगली आहे.
आंदोलन तूर्त केले स्थगित...संविधान बचाओसंदर्भात गेल्या ४५ दिवसांपासून पूनम गेटसमोर आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी महिला व मुलांची गर्दी आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर काझी सय्यद अमजदअली यांच्यासह प्रतिनिधींशी दोनवेळा चर्चा केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांना कोरोना साथीची परिस्थिती समजावून सांगून आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले. शहर काझी यांनीही साथीबाबतची स्थिती विशद केली, त्यानंतर सर्वांशी चर्चा करुन हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे शहर काझी व समन्वयक हसीब नदाफ यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केल्याने जिल्हाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले.