शीतलकुमार कांबळे
सोलापूर : सिद्धेश्वरांची पूजा करताना पानाचे विशेष असे महत्त्व आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये रोज पानपूजा करण्यात येते. ही पूजा बांधण्यासाठी सुमारे १६०० पाने आणली जातात. सकाळी सहा ते आठदरम्यान मखरावर पाने बांधली जातात. तीन ते चार जणांच्या संघाकडून पानबांधणीच्या पूजेचे काम केले जात असल्याचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी सांगितले.
मंदिराच्या गाभाºयात मखर आहे. या मखरमध्ये चार कवळ्या असून, एका कवळीमध्ये चारशे पाने बसतात. याप्रमाणे एका पानपूजेसाठी १६०० पाने लागतात. ही पाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रोज आणली जातात. विशेष म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात दिवसातून सकाळी एकदाच पानपूजा केली जाते. एका दिवशी दोन भाविक आल्यास नंतर आलेल्या भाविकाची पूजा ही दुसºया दिवशी करण्यात येते तर त्या दिवशी भाविकाला प्रसाद देण्यात येतो. वर्षातील ३६५ दिवस रोज पानपूजा केली जाते. पाने लावण्याचे काम पाहणारे सुमारे सात ते आठ जणांचा संघ असून, हब्बू पुजारी यांच्या मार्गदर्शनाने ही पूजा बांधण्यात येते. पानांमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. महादेवाचादेखील पानामध्ये वास असतो. एखाद्या कामामध्ये वारंवार अपयश येत असेल तर पानपूजा करण्यात येते.
पानपूजा बांधण्याचा ४० वर्षांचा अनुभव- मंदिरामध्ये करण्यात येणाºया पानपूजेसाठी आधी मखरावर पाने बांधावी लागतात. मंदिरातील हब्बू परिवाराच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण पानपूजा बांधतात. बसवराज शिरपनहळ्ळी, मडिवाळ स्वामी (गुंजोटीकर) हे मागील ४० ते ५० वर्षांपासून पानपूजा बांधतात. यांच्या सोबतीला अक्षय स्वामी, तुकाराम हेदेखील पानपूजा बांधतात. सकाळी सहा ते आठ असे दोन तास अत्यंत मनोभावे पानबांधणीचे काम केले जाते. यापूर्वी पानपूजा बांधण्यासाठी पितळीचे मखर होते. आता हे मखर चांदीचे करण्यात आले आहे.
सिद्धेश्वरांच्या मंदिरामध्ये रोज पानपूजा केली जाते. एखादे शुभकार्य करण्याआधी किंवा देवाकडे मागणे मागण्यासाठी ही पूजा करतात. रोज सकाळी सहा वाजता पानपूजेला सुरुवात करण्यात येते. या पानपूजेला गरुड पुराणात विशेष असे महत्त्व आहे.- शिवशंकर हब्बू, पुजारी, सिद्धेश्वर मंदिर.