सोलापूर महापालिकेचा निवांत कारभार; कोरोना कंट्रोल रुमची फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:11 PM2022-01-10T13:11:51+5:302022-01-10T13:11:57+5:30
कॉल सेंटर खासगी कंपनीला देण्याची तयारी
सोलापूर -शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या काळात महापालिकेचा कोरोना नियंत्रण कक्ष पुन्हा जोमाने कार्यान्वित करण्याची फाईल अद्यापही प्रशासकीय स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये एक डॉक्टर आणि दोन डाटा ऑपरेटर आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क साधणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना बेड मिळवून देणे यासह विविध अडचणी सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला होता. या नियंत्रण कक्षातून अनेकांना मदत मिळाली. या कामाचे राज्यस्तरावर कौतुक झाले. कोरोना कमी झाला तसा नियंत्रण कक्षाचे काम कमी करण्यात आले. आता कोरोना वाढल्यानंतर तत्काळ निर्णय घेण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर ‘बघू करू’ अशी उत्तरे ऐकायला येत आहेत.
कोणत्या दिवशी किती पॉझिटिव्ह
- सोमवार - २
- मंगळवार -१९
- बुधवार - १५
- गुरुवार - १४
- शुक्रवार - ४५
- शनिवार - २२
- रविवार -
----
असा आहे प्रस्ताव
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आणि कुटुबीयांशी संपर्क साधण्याचे काम एका खासगी कॉल सेंटर कंपनीला दिले होते. आता पुन्हा या कंपनीला काम द्यायचे की पालिकेचे कर्मचारी नेमायचे यावर खल सुरू आहे. कंट्रोल रुममध्ये आणखी तीन डाटा ऑपरेटर, नियंत्रणासाठी एक डॉक्टर नियुक्तीचा प्रयत्न आहे. संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी पुन्हा शिक्षकांना काम लागू शकते.
--
पुन्हा कोरोना झालेल्यांची नावे शोधणार
अनेकांना लस घेतल्यानंतरही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांनी अद्यापही लस घेतलेली नाही. अशी विविध प्रकारची माहिती शासनाने मागविली आहे. ही माहिती कंट्रोल रुममधून संकलित केली जाणार आहे.
---
कंट्रोल रुम पुन्हा सक्षम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाच्या कामात पुन्हा शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.
- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी, मनपा.