Smart solapur ; सोलापुरातील ५० यंत्रमाग कारखाने झाले अपग्रेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:09 PM2019-01-28T13:09:45+5:302019-01-28T13:11:00+5:30
महेश कुलकर्णी सोलापूर : चादर आणि टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरचा पॉवरलूम उद्योग आता हळूहळू कात टाकतोय. भारतासह संपूर्ण जगाला ...
महेश कुलकर्णी
सोलापूर : चादर आणि टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरचा पॉवरलूम उद्योग आता हळूहळू कात टाकतोय. भारतासह संपूर्ण जगाला बाथ टॉवेल पुरविणाºया यंत्रमाग उद्योगात मोठ्या प्रमाणात अपग्रेडेशन सुरू आहे. दिवसाला ३० किलो सूत कातणारे जुने लूम्स जाऊन आता परदेशी बनावटीचे नवे रॅपिअर लूम कारखान्यांमध्ये धडधडताहेत. सध्या ५० उद्योजकांनी असे लूम्स मागविले आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी ५० कारखाने अपग्रेड होणार आहेत.
सोलापूरला स्मार्ट करण्यासाठी सरकारने राज्यातील दहा शहरांच्या यादीत सोलापूरचा समावेश केला आहे. एकूणच शहर स्मार्ट होण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची कामे सध्या शहरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरचा नावाजलेला यंत्रमाग उद्योगही मागे राहिला नाही. तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी कारखानदार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. परंपरागत यंत्रमागाच्या जागी आता नवे आधुनिक यंत्रमाग बसविण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. शहरात एकूण साडेसहाशेच्या आसपास कारखाने आहेत. यातील ५० कारखान्यांंनी आधुनिक रॅपिअर लूम्स बसविले आहेत. हे लूम चीन, जर्मनी, इटली, बेल्जियम या देशांत तयार होतात. सोलापुरात प्रामुख्याने चीन, जर्मनी आणि बेल्जियमचे लूम्स आणले जात आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी ५० कारखानदारांची आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ३०० पेक्षा अधिक कारखान्यांमध्ये आधुनिक लूम्स बसविण्यात येणार आहेत.
‘एअरजेट’चा प्रवेश
- जपानी बनावटीचे टोयाटो एअरजेट लूम म्हणजे वेगाने उत्पादन असे समीकरण महाराष्टÑातील यंत्रमाग उद्योजकांत आहे. अत्यंत आधुनिक मानले जाणारे हे लूम सोलापुरात विनायक राचर्ला आणि इंदरमल जैन या दोन उद्योजकांनी आणले आहेत़ जुन्या लूमच्या तुलनेत दहापट अधिक वेगाने हे लूम उत्पादन करते. दररोज ३०० किलो सूतकताई आणि दिवसाला ६०० टॉवेल्स या लूममध्ये बनतात.
१२०० ग्रॅमची चादर, ५०० ग्रॅमचा टॉवेल
- सोलापुरातील चादर आणि टॉवेल उद्योगाची वार्षिक उलाढाल ११०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये टर्किश टॉवेलचा ८० टक्के वाटा आहे. उर्वरित २० टक्के जेकार्ड चादरी बनविल्या जातात. सोलापूरच्या एका चादरीला साधारणत: १२०० ग्रॅम सूत लागते तर टॉवेलला ४०० ते ५०० ग्रॅम एवढे सूत लागते.
रॅपिअरमध्ये दररोज १५० किलो सूतकताई
- जुन्या लूमवर एका दिवसात साधारणत: ३० किलो सूतकताई होते. नवीन रॅपिअर लूममध्ये दिवसाला १५० किलो सूतकताई होते. यामुळे उत्पादनात पाचपट वाढ झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांत बॅकफूटवर आलेला हा उद्योग आता नव्याने भरारी घेत आहे.
चादरीतही रॅपिअर
- सोलापुरात चादरी तयार करणारे कारखाने साधारणत: ९० ते १०० च्या आसपास आहेत. पारंपरिक पद्धतीने चादरी करणाºया कारखानदारांच्या नवीन पिढीने आधुनिक शिक्षण घेतल्यामुळे अपग्रेडेशनचे काम आता सुरू झाले आहे. ९० पैकी १० कारखानदारांनी चादरी बनविण्यासाठी नवे रॅपिअर लूम मागविले आहेत.
जागतिक बाजारपेठेत सोलापूरच्या टेक्स्टाईल उत्पादनांचे वेगळे स्थान आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या ठिकाणी इथल्या मालाला चांगली मागणी आहे. आधुनिकीकरणामुळे उत्पादन क्षमता अनेक पटीने वाढणार आहे. यामुळे अनेक कारखानदार यासाठी प्रयत्नशील आहेत. टफ अर्थात टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीमची सबसिडी शासनाने वाढवून ३० ते ३५ टक्के केल्यास अपग्रेडेशनची प्रक्रिया गतिमान होणार आहे.
- पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ.