भर रस्त्यावर अतिविषारी मण्यारने गिळला साप; जुळे सोलापुरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 01:00 PM2021-06-14T13:00:22+5:302021-06-14T13:00:31+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : जुळे सोलापुरातील दावत चौक येथे भर रस्त्यात अतिविषारी मण्यार जातीच्या सापाने दुसऱ्या एका सापाला गिळले. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य निखिल राठोड यांनी मण्यार सापाला पकडून मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी सोडले.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता प्रहार शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष राजेश काडादी मॉर्निंग वाॅक करत दावत चौक येथे आले. तेव्हा त्यांना रस्त्यावर एक साप दुसऱ्या सापास गिळताना दिसून आला. हे पाहण्यासाठी गर्दी होत होती. तिथली परिस्थिती पाहून त्यांनी या घटनेची माहिती वन्यजीवप्रेमी मुकुंद शेटे यांना फोनवरून दिली. शेटे यांनी निखिल राठोड यांना याबाबत सांगितले.
निखिल राठोड घटनास्थळी पोहोचल्यानंतर मण्यार सापाने दुसऱ्या सापास पूर्ण गिळले होते. मण्यार साप हा सुस्त होऊन रस्त्यावरच बसून होता. रोडवरून जाणाऱ्या वाहनांचा धोका ओळखून निखिल राठोड यांनी मण्यार सापास सुरक्षितरीत्या पकडले व जवळील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
मण्यार हा सर्प प्रजातीमधील अत्यंत विषारी सर्प आहे. या सापाचे विष हे नागापेक्षाही आठ पट विषारी असते. मण्यार साप हा निशाचर असून तो रात्रीच भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडताे. त्यामुळे हा साप दिवसा सहसा दिसून येत नाही. या सापाचे मुख्य खाद्य हे इतर सर्प आहेत. या सापाचा रंग काळा व त्यावर पांढऱ्या पट्ट्या असतात. पोटावर पांढरा रंग असतो. हा साप लाजाळू व शांत आहे.