महेश कोटीवालेवडवळ (जि. सोलापूर) : दावणीच्या जनावरांवर पोटच्या लेकरप्रमाणे प्रेम करणारा शेतकरी म्हणजे खºया अर्थाने काळ्या आईचा लेक...मग तो त्यासाठी वाटेल ती किंमत मोजतो. असाच एक व्यवहार झाला तो जातिवंत खिलार बैलाचा जो विकला गेला अडीच लाखाला.तांबोळे (ता. मोहोळ) येथील मछिंद्र पवार व दिगंबर पवार या पिता पुत्रांनी मोठ्या जिद्दीने सांभाळून मोठा केलेला जातिवंत खिलार बैल मोहोळ तालुक्यातील बागायतदार सर्जेराव निळे व नितीन निळे या बंधूनी तब्बल अडीच लाख रुपयाला विकत घेतला.काही वर्षापूर्वी निळे यांच्याकडूनच पवार यांनी हाच खिलार विकत घेतला होता, तेंव्हा पवार यांच्याकडे पैसे नव्हते. पत्नीच्या अंगावरील सर्व दागिने विकून ६१ हजार रुपयांमध्ये पवार यांनी याला खरेदी केले व सोने विकून हा बैल घेतला म्हणून याचे नाव पवार यांनी सोन्या असे ठेवले. आज त्याची किंमत अडीच लाखाला गेली तेव्हा सोन्याने आमचे सोने केले अशी प्रतिक्रिया आसवे पुसत दिगंबर पवार यांनी दिली.कसा आहे सोन्या...हा सोन्या जातिवंत मैसूर काजळा हरणा जातीचा असून याची उंची तब्बल साडेसहा फूट आहे. हा बैल दिसायला अत्यंत देखणा असून पाहताक्षणी नजर हटणार नाही असा याचा रुबाब आहे. याला मैदा, उडीद दाळ, चुरा पेंड, मका भरडा, हिरवी वैरण आदी प्रकारचा खुराक दिवसातून दोन वेळा द्यावा लागतो. याचा वर्षाचा अंदाजे खुराक खर्च ५० हजार पर्यंत येतो. याला राहण्यासाठी स्वतंत्र जागा व वेगळी व्यवस्था केली आहे. एक शाही रुबाब याला मिळाला असून याचा नुसता वावर आपल्या दारात असणे हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे असे दोन्ही शेतकरी मानतात़
सोलापुरात खिलार बैल विकला गेला अडीच लाखाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 4:25 AM