सोलापूर : काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच काँग्रेसभवनमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रदेश काँग्रेस कमिटीत सोलापूरला पहिल्यांदाच असा मान मिळाल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. सहा. कार्यकारी अध्यक्षांमध्ये आमदार शिंदे यांचाही समावेश आहे. सोलापूरला बऱ्याच काळानंतर प्रदेश कमिटीत स्थान मिळाल्याचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदेश अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून दोनवेळा पदभार सांभाळला आहे. त्यानंतर प्रदेश कमिटीवर माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, यलगुलवार, रामहरी रूपनवर, कै. विष्णुपंत कोठे, हेमू चंदेले, सुधीर खरटमल यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. कार्यकारी अध्यक्षपदावर आमदार शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरला पहिल्यादांच मान मिळाला आहे.
चांगले काम करतील : सुशीलकुमार
या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समाधान व्यक्त करून आमदार शिंदे या काँग्रेसच्या बळकटीसाठी चांगले काम करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आमदार शिंदे यांची नियुक्तीनंतर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये जल्लोष साजरा केला.