Solapur: शॉटसर्किटमुळे लॉन्ड्री व्यवसायीकाचे घर जळून खाक, मडकी वस्ती येथील प्रकार
By संताजी शिंदे | Published: July 15, 2023 01:12 PM2023-07-15T13:12:17+5:302023-07-15T13:13:04+5:30
Solapur: पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील एका लॉंड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत मोटारसायकल, संसाय उपयोगी साहित्यासह १० लाखाचे नुकसान झाले.
- संताजी शिंदे
सोलापूर - पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील एका लॉंड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत मोटारसायकल, संसाय उपयोगी साहित्यासह १० लाखाचे नुकसान झाले.
पुणे महामार्गावरील गणेश नगर मडकी वस्ती येथील एका घरात अचानक शॉटसर्किट झाला. त्यामुळे पत्र्याच्या घरातील आतील साहित्याला आग लागली. आग लागल्यानंतर धुराचे लोळ बाहेर पडू लागले, कुटुंबियांनी तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण केले. अग्नीशामक दल व फौजदार चावडीचे पोलिस काही मिनीटात घटनास्थळी दाखल झाले, जवानांनी पाण्याचा मारा करण्यास सुरूवात केली. काही जवानांनी जीव धोक्यात घालून घरातील गॅसची टाकी बाहेर काढली. जोरात पाण्याचा मारा केल्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आली. आग विझल्यानंतर पाहिले असता, आतील मोटारसायकल, ईस्त्रीसाठी आलेले कपडे, संसार उपयोगी साहित्य, कपाट व त्यातील कपडे, दागिने, पैसे आदी साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. आग लागलेले घर हे पांडूरंग काटकर यांचे असल्याचे समजते. त्यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे.
गॅसची टाकी काढल्याने अनर्थ टळला
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग लागलेली असताना, धोकादायक स्थितीत घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरात असलेली गॅसची टाकी बाहेर काढली अन ती लांबच्या अंतरावर ठेवली. टाकीचा जर स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही धोका झाला असता अशी माहिती अग्नीशामक दलाचे अधिक्षक केदार आवटे यांनी दिली.
कुटुंबीयांना दिला धीर
आग लागल्या नंतर काटकर कुटुंबीय भयभीत झाले होते. अग्नीशामक दलाने आग विझवल्यानंतर घरात काहीच राहिल नसल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे लॉंड्रीचा व्यवसाय असलेल्या काटकर कुटुंबियांवर आसमानी संकट कोसळले. दरम्यान घटनास्थळी गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बिज्जू प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुरेश तोडकरी यांनी कुटुंबियांना धिर दिला. हातावर पोट असलेल्या या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.