संतोष आचलारे
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदानात गुरुवारी ५८.४५ टक्के इतके मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत तब्बल १ लाख ३१ हजार ४०६ मतदारांनी वाढीव मतदान केले. विशेष म्हणजे मतदानात पुरुषांपेक्षा रणरागिणींचा पुढाकार उत्स्फूर्त आहे. यंदाच्या निवडणुकीत ५९ हजार ८०३ पुरुषांनी तर ७१ हजार ६०७ महिलांनी वाढीव मतदान केले आहे.
२०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत सोलापूर लोकसभेसाठी एकूण १६ लाख ९९ हजार ४४० मतदार होते. यापैकी ९ लाख ४९ हजार ९८० मतदारांनी ५५.८८ टक्के इतके मतदान केले होते. या निवडणुकीत ८ लाख ९२ हजार १८५ पुरुष मतदार होते. यापैकी ५ लाख २६ हजार ५८१ पुरुषांनी मतदान केले होते. महिला मतदारांची यावेळी ८ लाख ७ हजार ६३३ इतकी संख्या होती. यापैकी ४ लाख २३ हजार ३९५ महिलांनी मतदान केले होते. तृतीयपंथी मतदारांची संख्या २२ इतकी होती, यापैकी ४ जणांनी मतदान केले होते. गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानासाठी एकूण १८ लाख ५० हजार २ इतके मतदार होते. यात पुरुष मतदार ९ लाख ६३ हजार ३८४ इतके होते. यापैकी ५ लाख ८६ हजार ३८४ मतदारांनी मतदान केले. महिला मतदारांची संख्या ८ लाख ८६ हजार ५६४ इतकी होती. यापैकी ४ लाख ९५ हजार २ महिलांनी मतदान केले आहे.
उन्हातही मतदान वाढले- मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान सरासरी ५५.८८ टक्के इतके मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ५८.४५ टक्के इतके मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्के मतदान वाढले गेले आहे. कडक ऊन असतानाही मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखविला. विशेषत: नवमतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत होता.