- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर - जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना ब्लड बँकांना आता जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्याबाहेर अधिक रक्तपुरवठा होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे ही टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेने सर्व ब्लड बँकांना नव्या नियमाचे सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन नियमामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त टंचाई कमी होत असल्याची माहिती जिल्हा औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सचिन कांबळे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात एकूण १८ खाजगी तसेच एक शासकीय रक्तपेढी आहे. रक्त संकलन परिषद ही रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवणारी शासकीय संस्था आहे. जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकाची एनओसी लागत नव्हती. शासकीय रुग्णालयांनी महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषदेला पत्र लिहून रक्तटंचाईची माहिती दिली. शासकीय रुग्णालयात मुबलक रक्तपुरवठा केल्यानंतरच संबंधित रक्तपेढ्यांना जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रक्त संकलन परिषदेने शासनाकडे केली. त्यानंतर नवीन नियम लागू केले.