शीतलकुमार कांबळे
सोलापूर : आपल्या शहरामध्ये धुळीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरात सोलापूरचा क्रमांक हा १६ वा आहे. धुळीच्या समस्येमुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यावर आळा घालण्यासाठी महापालिकेतील पर्यावरण कक्ष सरसावला असून, क्लीन एयर मिशन (स्वच्छ हवा मिशन) अंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.
महापालिकेत आॅगस्ट २०१९ पासून पर्यावरण कक्षाची सुरुवात झाली असून, आता या कक्षाकडून कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जागृतीसाठी २० लाख रुपये मंजूर झाले असून, पहिल्या टप्प्यातील १२ लाख रुपये लवकरच पर्यावरण कक्षाला मिळणार आहेत. हा निधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मिळेल.
पर्यावरण कक्षाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कृती आराखडा दिला आहे. यात रस्ता, वाहतूक, ग्रीन झोन, औद्योगिक, स्मशानभूमी सध्याची स्थिती कशी आहे, या माहितीसोबत शहरातील धूळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, याचे नियोजन देण्यात आले आहे. महापालिके कडून नियमित जी कामे होतात त्यातून प्रदूषण कसे कमी करता येईल, याकडे पर्यावरण कक्षाचे लक्ष असणार आहे. डिव्हायडरमध्ये योग्य पद्धतीने झाडे लावणे, स्वच्छता करणे, ट्रॅफिक सिग्नल, स्क्रॅप गाड्या बंद करणे या कामांमध्ये पर्यावरण कक्ष हा समन्वयाचे काम करणार आहे.
शहरस्तरीय समिती स्थापन होणार- नॅशनल क्लीन एयर प्रोग्रॅमच्या अंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी सोलापुरात शहरस्तरीय समिती स्थापन होणार आहे. या समितीमध्ये महापालिकेचे आयुक्त हे अध्यक्ष असणार आहेत. तसेच ट्रॅफिक पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, पाटबंधारे, स्मार्ट सिटी या सर्व विभागांचा प्रतिनिधी या समितीत काम करणार आहे. शहरात या विविध विभागांकडून चालणारी कामे क्लीन एयरमधून कशी चालतील, यासाठीचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी दर महिन्यात बैठकीतून आढावा घेण्यात येणार आहे.जनजागृतीसाठी निरीकडून साहित्य- निरीकडून (नॅशनल एन्व्हायरन्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) धूळ व हवेचे प्रदूषण कसे रोखायचे याबाबत अभ्यास साहित्य (स्टडी मटेरिअल) देण्यात येणार आहे. या साहित्याचा वापर करून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यात हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याबाबत माहिती देण्यत आली आहे. ही माहिती शाळा, महाविद्यालये, विविध संस्था यांना देण्यात येणार आहे. यासाठी कार्यशाळा, मॅरेथॉन, रॅली, प्रसार माध्यमांचा वापर आदी उपक्रम घेण्यात येणार आहे.