सोलापूर महापालिकेचे उपमहापौर अन् भाजपा नेते राजेश काळेंना अटक
By महेश गलांडे | Published: January 5, 2021 12:02 PM2021-01-05T12:02:05+5:302021-01-05T12:03:10+5:30
सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इ -टॉयलेट सह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केली.
सोलापूर - महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर पोलिसांनीअटक केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या शिवीगाळप्रकरणी आज सकाळीच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे, जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली असून राजकीय वादही पेटण्याची चिन्हे आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणे तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. यापूर्वीच राजेश काळे यांना स्वपक्ष म्हणजे भाजपातून तसंच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही भाजपसह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या राजेश काळे यांना अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी विविध पथके तैनात केली होती दरम्यान मंगळवारी राजेश काळे हे पुण्यला जात असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आज टेंभुर्णी येथे त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे
सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इ -टॉयलेट सह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केली. ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्र व्यवहार होणे अपेक्षित असल्याचं पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या काळे यांनी पांडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिसात वारंवार खंडणी मागणे व शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कसल्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे आणि कर्मचाऱ्यावर दबाव आणून कामे करून घेणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही पालिका आयुक्तांनी दिला.
राजेश काळे यांनी केलेल्या शिवीगाळीचे पडसाद पालिका वर्तुळात दिसून आले होते. गेल्या आठवड्यात (बुधवारी) दिवसभर कर्मचार्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या घटनेचा निषेध केला होता. पालिकेच्या कॅबिनेट पदावर असताना पदाचे भाग आणि मान न ठेवता शिवीगाळ करणाऱ्या उपमहापौरांना तात्काळ अटकेची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली होती. त्यानुसार, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, भाजपातील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे, मात्र खंडणी मागितली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारीसुद्धा काळे यांनी दाखवली आहे. राजेश काळे यांच्यावर हा काही पहिलाच गुन्हा नाही. याआधी त्यांच्यावर जुळे सोलापूर येथील जागेच्या वादातून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. शिवाय भाजपचे माजी महापौर किशोर देशपांडे यांना शिवीगाळ, भाजपातील महिला सदस्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, यापूर्वीचे आयुक्त दीपक तावरे यांच्या बद्दल अपशब्द वापरणे, कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अडथळा आणलाचा काळेंवर आरोप आहे.