साेलापूर : महापालिकेच्या प्रारूप आराखड्यातील भाैगाेलिक सीमांच्या रचनेनुसार मतदार यादी विभाजनाचे काम सुरू करावे. २८ फेब्रुवारीपर्यंत मतदार यादी विभाजनाचे काम पूर्ण करावे, असे पत्र राज्य निवडणूक आयाेगाला महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
महापालिकेने मंगळवारी प्रारूप प्रभार रचना जाहीर केली. आरक्षण निश्चिती अद्याप झालेली नाही. ओबीसी आरक्षणाचा विषयही प्रलंबित आहेत. मात्र यावर लवकरच ताेडगा निघेल आणि एप्रिल महिन्यात निवडणुका हाेण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी विभाजनाची कार्यवाही वेळेवर पूर्ण करण्यात यावे, असे आदेश आयाेगाने दिले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी महापालिकेला शहराची मतदार यादी सुपूर्द केली आहे.
महापालिकेने मतदार यादी व पुरवणी यादीची तपासणी करावी. वगळण्यात आलेल्या नावांवर शिक्का मारावा. या दाेन्ही याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करावे. या कामात पारदर्शकता राहावी यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करावा, कंट्राेल चार्जव्दारे मतदार यादी पूर्ण करावी, असेही आयाेगाने कळविले आहे. या कामात आयाेगाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कामी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी नावे आठ फेब्रुवारीपर्यंत आयाेगाला कळविण्यात यावीत. सध्या प्रभाग रचनेवर हरकती मागविल्या जात आहेत. या हरकतींवरील सुनावणीनंतर बदल झाल्यास यादीमध्येही त्या-त्यावेळी बदल करण्यात येतील. प्रभाग रचना २ मार्च राेजी अंतिम हाेणार आहे. परंतु, तत्पूर्वीच पालिकेने मतदार याद्यांच्या विभाजनाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
--
दुसऱ्या दिवशी एकही हरकत नाही
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर बुधवारी एक हरकत आली हाेती. ही हरकत प्रभाग क्र. १० व ११ वर आहे. गुरुवारी एकही हरकत दाखल झालेली नाही, असे सहायक आयुक्त विक्रम पाटील यांनी सांगितले. हरकती दाखल करण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे.
--
शहराची मतदार यादी आणि पुरवणी यादी महापालिकेला सुपूर्द केली आहे. आयाेगाच्या निर्देशानुसार यापुढील काळातही कार्यवाही केली जाईल.
- भारत वाघमारे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी.
--