रात्रीचं सोलापूर ; पहारीचा खणखणाट अन् शिट्टीची फुरफुर.. जागते रहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:06 PM2018-12-28T15:06:44+5:302018-12-28T15:13:31+5:30
रात्री : 3:00 ते 3:30 सोलापूर : रात्रीचे तीन वाजलेले... मुख्य शहरापासून लांब असलेला आसरा भाग, तसेच दिवसेंदिवस वाढत ...
रात्री : 3:00 ते 3:30
सोलापूर : रात्रीचे तीन वाजलेले... मुख्य शहरापासून लांब असलेला आसरा भाग, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणाºया जुळे सोलापुरातील कल्याणनगर, पाण्याची टाकी, म्हाडा, वसुंधरा महाविद्यालय, डी. फार्मसी महाविद्यालय, सोलापूर-विजापूर राष्टÑीय महामार्गावरील सैफुलपर्यंत फेरफटका मारला.
शहरातील मध्यवस्तीच्या मानाने आसरा भाग सोडला तर इतर ठिकाणी वर्दळ फारशी अशी नाही. सध्या साखर कारखाने सुरु असल्यामुळे उसाची वाहतूक करणारी वाहने, सिमेंट कंपन्या यामुळे आसरा चौकात वाहनांची वर्दळ ही सुरूच असलेली दिसली. अधूनमधून प्रवासी घेऊन येणाºया रिक्षा, पेट्रोलिंग करणारी पोलीस वाहने, एखाद्दुसरी दुचाकी अशी वाहने ये-जा करताना दिसत होती तर जुळे सोलापुरातील शांतता भेदत ठराविक अंतराने आसरा पुलाखालून रेल्वेगाड्याही ये-जा करताना दिसल्या. अधूनमधून रखवालदाराच्या शिट्ट्या तसेच त्याने रस्त्यावर आपटलेल्या लोखंडी पहारीचा आवाज सारे काही सुरक्षित असल्याचे सांगत होता.
रखवालदार गुरखा...
- रेल्वे पुलाजवळील एन. जी. मिल सोसायटीजवळील रस्त्यावर लोखंडी पहारीचा खणखणाट व शिट्टीची फुरफुर करीत... जागते रहो.. असे ओरडत जाणारा गुरखा दिसला. नेपाळमधून आलेला हा शेरसिंग नावाचा गुरखा दत्त मंदिराजवळील कल्याणनगर भागात राहतो. गेल्या वर्षभरापासून तो सोलापुरात रखवालदारी करतो. रात्री १२ ते पहाटे चार अशी शेरसिंगची ड्यूटीची वेळ.
रिक्षा चालकांच्या गप्पाटप्पा...
- आसरा चौकातच कॉर्नरला तीन रिक्षा प्रवाशांची वाट पाहत उभ्या असलेल्या. एका रिक्षात तिन्ही रिक्षांचे चालक गप्पाटप्पात मग्न असलेले दिसले. यातील एक रिक्षा चालक पद्मराज गंगाराम दुर्गे हे १९९६ पासून रिक्षा चालवितात. विशेष म्हणजे दिवसा कापड दुकानात काम करून रात्री ते रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. असिफ अब्दुल रऊफ हे दोन वर्षांपासून तर सोहेल शेख हे चार वर्षांपासून रिक्षा चालवितात.
दुधाची ने-आण...
- पाण्याच्या टाकीजवळील तुळजाई दुग्धालय येथे तीन जण दुधाच्या क्रेट टेम्पोमध्ये चढविताना दिसले. या ठिकाणांहून इंदापुरातून येणाºया या दुधाचा सोलापुरातील विविध भागात या टेम्पोतून पुरवठा केला जातो. या टेम्पोतून दूध वाहतूक करणारे सोमनाथ कस्तुरे हे गेल्या १२ वर्षांपासून या व्यवसायात आहेत.
रात्री दोन वाजेपासून गरमागरम चहा...
- आसरा चौकातील मातोश्री टी कॉर्नर येथे अनेक चालक मंडळी थंडीत गरमागरम चहाचा आस्वाद घेताना दिसली. रवी राजू जाधव यांची ही चहाची टपरी. गेल्या दोन वर्षांपासून ते ही टपरी चालवितात. रात्री दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जाधव यांची ही चहा टपरी सुरू असते. एवढ्या पहाटे सुरू असलेली ही एकमेव चहा टपरी दिसली. चहाबरोबरच विविध प्रकारची बिस्किटेही येथे होती.
रात्री साडेतीनला स्वयंपाक तयार
- डी. फार्मसी कॉलेजजवळील मैदानाजवळून जाताना बोअरवेल खणणाºया केए ०१ बी व केए ०१ एमएल ५२९९ या क्रमांकाच्या दोन गाड्यांजवळ एक जण स्वयंपाक करताना दिसला तर त्याचे सहकारी झोपलेले दिसले. तामिळनाडूहून हे सारे जण बोअरवेल कामासाठी आले आहेत.
ट्रॅक्टर ट्रॉलीमधून कललेला ऊस...
- सोलापूर-विजापूर महामार्गावरील सैफुलजवळ मंगळवेढा रोडवरील एका कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेला एक ट्रॅक्टर दिसला. यातील ट्रॉलीमध्ये खचाखच भरलेला ऊस एका बाजूने धोकादायकपणे कललेला होता. त्याही स्थितीत ट्रॅक्टरचालक आपले वाहन तसेच पुढे नेत होता.