सोलापूर रेल्वे पोलीसांची कारवाई ; वन्यजीवांची तस्करी करणारा गजाआड; चार साप, कबुतर, कॅमेरा, लॅपटॉप जप्त
By Appasaheb.patil | Published: January 15, 2019 10:46 AM2019-01-15T10:46:59+5:302019-01-15T10:48:34+5:30
सोलापूर : उजनी बॅकवॉटर परिसरात फोटोशूट करून तस्करी करण्याच्या हेतूने पकडलेले चार साप, दुर्मिळ जातीचे कबुतर, मोठ्या लेन्सचा कॅमेरा ...
सोलापूर : उजनी बॅकवॉटर परिसरात फोटोशूट करून तस्करी करण्याच्या हेतूने पकडलेले चार साप, दुर्मिळ जातीचे कबुतर, मोठ्या लेन्सचा कॅमेरा व लॅपटॉप जप्त करण्यात आरपीएफ पोलीस वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांना यश आले आहे. या जंगली प्राण्याची तस्करी करून ओरिसा राज्यात विक्री करण्याच्या हेतूने त्याने तस्करी केली आहे, अशी माहिती आरपीएफ पोलिसांना तस्कराने दिली.
चंद्रभान रंक आमिन (वय ३३, रा़ भारती नगर, वॉर्ड नंबर १८, बरगढ, ओडिशा ) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी दुपारच्या सुमारास आरपीएफ कंट्रोल रूम पुणे विभागातून रेल्वे गाडी क्रमांक २२८४५ मधून एक संदिग्ध वन्यजीव तस्करी करणारा आरोपी जात आहे़ त्याच्याजवळ काही जंगली प्राणी आहेत़ तो डबा क्रमांक १०, सीट नंबर १ वर बसून प्रवास करीत असल्याचा संदेश गुप्त यंत्रणेकडून सोलापूरच्या आरपीएफ पोलिसांचे सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांना मिळाला होता़.
या संदेशाच्या आधारे जयण्णा कृपाकर यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रेसुब यांना अहमदनगर येथे आपली पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या़ दरम्यान, पुणे विभागातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रेल्वे गाडीची तपासणी करून वन्यजीव अधिकाºयांना त्याबाबत कळविण्याचे आदेश रेसुब यांना कृपाकर यांनी दिली़ या माहितीच्या आधारे रेसुब यांनी पुणे विभागातून निघालेली गाडी क्रमांक २२८४५ ची तपासणी केली़ यावेळी पुणे विभागातून मिळालेली माहिती खरी ठरवून संबंधित तस्करास अटक केली़ यावेळी त्या तस्कराकडून चार साप, दुर्मिळ जातीचे कबुतर, मोठ्या लेन्सचा कॅमेरा, लॅपटॉप, सापासारखा दिसणारा प्राणी, एक रिंगुआना, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले.
पुणे विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोलापूरच्या आरपीएफ पोलिसांनी त्या वन्यजीव तस्करास अटक केली आहे़ याबाबतची माहिती वन्यजीव विभागाला दिली आहे़ वन्यजीव विभाग व आरपीएफ पोलीस संयुक्तपणे तपास करीत आहेत़
-जयण्णा कृपाकर,
विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ पोलीस, सोलापूर रेल्वे मंडल़