सोलापूर : मागील वर्षीप्रमाणे यंदाही जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पुणे विभागातील पावसाच्या प्रमाणाचा विचार करता पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १५६ टक्के, तर यावर्षी १५५.७ टक्के म्हणजेच २४५.२ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सांगलीत १३९ टक्के; तर पुण्यात ७१ आणि कोल्हापुरात ७० टक्के वृष्टीची नोंद झाली आहे.
पुणे विभागातील कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांचा काही भाग वगळता उर्वरित भागात जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस पडतो. सोलापूर जिल्ह्यात माञ जून, जुलै महिन्यांतील पाऊस बेभरवशाचा असतो. या दोन महिन्यांत सोलापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडतो. त्यावरच खरिपाची पेरणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यात श्री. गणेशाच्या आगमनानंतर पाऊस जोर धरतो. जिल्हात परतीचा पाऊस चांगला पडतो; पण मागील वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात जून -जुलै महिन्यांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. विभागातील त्या-त्या जिल्ह्याच्या सरासरीची आकडेवारी पाहिली असता विभागात सोलापूर जिल्ह्यात सलग दोन वर्षे सर्वाधिक पाऊस पडला आहे.
१७ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात २५३.७ मि.मी. म्हणजे ७१.१ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ५३६.७ मि.मी. म्हणजे ७०.५ टक्के. सातारा जिल्ह्यात ३४४.४ मि.मी. म्हणजे ९२.५ टक्के, सांगली जिल्ह्यात २८९ मि.मी. म्हणजे १३९ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात २४५.२ मि.मी. म्हणजे १५५.७ टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी सरासरीच्या कोल्हापूर जिल्ह्यात ६८ टक्के, पुणे जिल्ह्यात ७८ टक्के, सातारा जिल्ह्यात ८४ टक्के, सांगली जिल्ह्यात १२४.२ टक्के तर सोलापूर जिल्ह्यात १४४ टक्के पावसाची नोंद झाली होती. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षा इतकाच पाऊस पडला आहे.
मंगळवेढा मंडलात सर्वाधिक पाऊस
- - सोलापूर जिल्ह्यात वाघोली व विंचूर मंडळात प्रत्येकी २०२.१ टक्के, पानगाव, लऊळ, म्हैसगाव व नाझरा मंडलात २०५ टक्के, महुद २०६ टक्के, हुलजंती २०८ टक्के, शेटफळ २१० टक्के, सावळेश्वर २१२ टक्के कामती २२४.२ टक्के, मारापूर २३०.७ टक्के तर मंगळवेढा मंडळात सर्वाधिक २५६.७ टक्के पाऊस पडला आहे.
- - अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मंडलात सर्वात कमी ७७.६ टक्के, दहिगाव मंडलात ८५.५ टक्के, खांडवी मंडलात ९१.३ टक्के, तर सुर्डी मंडलात ९१.२ टक्के पाऊस पडला आहे.
- - १७ जुलैपर्यंत पुणे विभागात ३८८.६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ३२७.३ मि.मी. म्हणजे ८४.२ टक्के पाऊस पडला, तर मागील वर्षी १७ जुलैपर्यंत ३१० मि.मी. म्हणजे ७९.८ टक्के पाऊस पडला होता.