माढा : पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी देऊन पोलिसाचा गौरव करणा-या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांप्रती पुन्हा माणुसकी जागवल्याचे दर्शन झाले आहे. कुर्डूवाडी येथे पोलीस खात्यात सेवा बजवणारे माढ्यातील सहाय्यक पोलीस फौजदार सहदेव जगदाळे यांचे कोरोनामुळे ७ रोजी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या माढ्यात आल्या होत्या.
मॅडम माझ्या पतीने कुटुंबियापेक्षा सेवेसाठी वाहुन घेतले होते.आमच्यासाठी वेळ देखील देत नसल्याची भावना सहादेव जगदाळे यांच्या पत्नीने व्यक्त केली.
यावेळी कुटुंबियांना शासकीय मदत व कुटुंबातील एकाला पोलीस खात्यात समावेश करण्याचे आश्वासन दिले.तर आडीअडचणीत मदत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. मुलांनी अनुकंपा खाली नोकरी लागेल म्हणून गफील न राहता आणखी मोठे होण्याचे स्वप्न बाळगून यशाचे शिखर गाठण्याचा मोलाचा सल्लाही त्यांच्या मुलांना देत कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले,भाऊ आसा परिवार आहे.यावेळी पोलीस उपाधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, शिवाजी जगदाळे,प्रविण जाधव, भिवाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
पोलीस फौजदार सहदेव जगदाळे यांच्या वडिलांचे २१ डिसेंबर रोजी निधन झाले होते.तर सहदेव जगदाळे यांचे गुरूवार ७ जानेवरी रोजी निधन झाल्याने कुटुंबियावर मोठा आघात झाला आहे.