सोलापूर : करारानुसार एक दिवस उशिराने म्हणजे १६ डिसेंबरला महापालिकेने होम मैदान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या हवाली केले खरे; मात्र आज दहा दिवस झाले तरी मैदानावर जैसे थे चित्र आहे. पंच कमिटीचे सदस्य म्हणे, ना खड्डे बुजवले, ना लोखंडी साहित्य हटवले... धुळीचा प्रश्न निर्माण होतो की काय, असा सवाल करीत त्यांनी आहे त्या स्थितीत स्टॉल्स टाकणे अशक्य असल्याचेही नमूद केले.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर होम प्रदीपन आणि शोभेचे दारुकाम सोहळा पार पडत असतो. करारानुसार १५ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत होम मैदान पंच कमिटीच्या ताब्यात असते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत होम मैदानावर सुशोभिकरणाचे काम सुरु असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मैदानाभोवती लोखंडी ग्रील असलेली संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, आत प्रवेश करण्यासाठी १३ प्रवेशद्वार सोडलेले आहेत.
यंदाच्या यात्रेनिमित्त काही अटी घालून मैदान पंच कमिटीच्या ताब्यात दिले असले तरी अद्याप मैदानाचे सपाटीकरण, खड्डे बुजविणे, लोखंडी साहित्य हटविण्याचे काम पूर्ण झाले नाही. हरिभाई देवकरण प्रशालेच्या समोर उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मैदान आणि पुलाच्या मध्ये मोठा खड्डा पडला असून, यात्रेत सहभागी लहान मुलांना याचा अधिक धोका आहे. त्यासाठी ही मोकळी जागा बंदिस्त केली जावी. त्याचबरोबर मैदानाच्या डागडुजीचेही काम एक-दोन दिवसांमध्ये महापालिकेने पूर्ण करण्याची मागणी पंच कमिटीचे सदस्य तथा स्टॉल्स समितीचे चेअरमन बाळासाहेब भोगडे यांनी केली.
महापौरांकडून पाहणी !- सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी पंच कमिटीच्या कर्मचाºयांसमवेत मंगळवारी होम मैदानाची पाहणी केली. पाहणीत मैदानाची सुधारणा होण्याची गरज असल्याचे भोगडे म्हणाले. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी संपर्क साधला उद्या (बुधवारी) अथवा परवा (गुरुवारी) त्या मैदानाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आखणीचे कामही रखडले !च्मैदान ताब्यात आल्यावर महापालिकेकडून यात्रा कृती आराखड्यानुसार तात्पुरती होम मैदान पोलीस चौकी, पाळणे, स्टॉल्स, आपत्कालीन रस्ता आदींची आखणी केली जाते. त्यानंतरच स्टॉल्स उभारले जातात. मात्र आतापर्यंत तरी महापालिकेकडून आखणीच झाली नसल्याची खंत बाळासाहेब भोगडे यांनी व्यक्त केली.