सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील मंदिरेही आकर्षक दीपमाळांनी होणार प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:16 PM2018-12-28T15:16:53+5:302018-12-28T15:21:10+5:30
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेत अनेक ...
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेत अनेक सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील सर्व घरांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसणार आहे. मार्गावरील आजोबा गणपती, मार्कंडेय मंदिर, चाटी गल्लीतील बालाजी मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर, कसबा गणपती मंदिर विद्युत दिव्यांच्या सजावटीने प्रकाशमान होणार आहे.
सिद्धरामेश्वर गड्डा यात्रा जशी जवळ येत आहे, तसा सोलापूरकर भक्तांमध्ये उत्साह वाढत आहे. यंदा यात्रा परंपरेप्रमाणे घरोघरी दिवाळीप्रमाणे दिवे लावण्यासोबत विद्युत रोषणाईने घरे, इमारती सजविण्याची लगबग सुरू आहे. सोलापूरच्या प्रसिद्ध आजोबा गणपती ट्रस्टमार्फत माणिक चौक ते कालिका मंदिरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा यामध्ये वेगळेपणा आणण्याचा विचार आहे, असे उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी सांगितले. आजोबा गणपतीसमोर यात्रेतील सातही नंदीध्वजांचे पूजन करण्यात येते. अध्यक्ष गौरीशंकर फुलारी, सेक्रेटरी अनिल सावंत, चंद्रकांत कळमणकर, गवसने अप्पा, आप्पासाहेब म्हंता, सातलिंग दुधनीकर हे ट्रस्टचे सदस्य नवीपेठ, दत्त मंदिर ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत सर्व भक्त व दुकानदारांनी आपला परिसर विद्युत रोषणाईने सजावट करण्यासोबत दीपोत्सवाने नंदीध्वजांचे स्वागत करावे असे आवाहन केले.
पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनीचे मंदिर हे मिरवणूक मार्गावरील महत्त्वाचे स्थान आहे. मंदिरासमोर बुट्टे घराण्यातर्फे विसावा असून, यात्रा मिरवणुकीतील चारही दिवस या ठिकाणी सातही नंदीध्वज एकत्र येतात. मार्कं डेय मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते, असे सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी सांगितले. यात्रेच्या मिरवणुकीत नंदीध्वजांचे पूजन व स्वागत पद्मशाली समाजाच्या वतीने करण्यात येते. तर अक्षता सोहळ्यास जाताना मानकरी हिरेहब्बू यांच्याकडून मार्कंडेय महामुनीची आरती होते.
माहेश्वरी समाजातर्फेही रोषणाई
- वीरशैव व्हिजन, ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत माहेश्वरी व मारवाडी समाजाच्या वतीने चाटी गल्ली येथील बालाजी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभाचे अध्यक्ष चंद्रकांत तापडिया व सचिव जवाहर जाजू यांनी सांगितले. १६ डिसेंबर ते १४ जानेवारी मारवाडी समाजात मोठ्या उत्साहात धनुर्मास उत्सव साजरा केला जातो. याच काळात सिद्धरामेश्वरांची यात्रा असते. मारवाडी समाजाची ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांवर अपार भक्ती असून यात्रेत कुटुंबासह सहभागी होतात.
कसब्यात घराघरांवर रोषणाई
- कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणूक सुरू होते. येथील कसबा गणपती मंडळाच्या वतीने मंदिरासह बाळीवेस परिसरात मिरवणूक मार्गावर पंधरा वर्षांपासून विद्युत रोषणाई करण्यात येते. मानकºयांच्या घरी दिवेलावणीसोबत घरोघरी विद्युत रोषणाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, चिदानंद मुस्तारे यांनी व्यक्त केला.