सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मातीच्या ५१ घागरी घेऊन हिरेहब्बू वाड्यात पोहोचल्या अनेक सुशिक्षित कुंभार भगिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:24 PM2019-01-12T13:24:00+5:302019-01-12T13:27:16+5:30
सोलापूर : कुंभार समाजातील ५१ महिला डोक्यावर मातीच्या घागरी घेत शुक्रवारी सकाळी बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यात दाखल झाल्या. हिरेहब्बू ...
सोलापूर : कुंभार समाजातील ५१ महिला डोक्यावर मातीच्या घागरी घेत शुक्रवारी सकाळी बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यात दाखल झाल्या. हिरेहब्बू मंडळींनी त्या घागरींचा स्वीकार केला. विशेष म्हणजे यातील अनेक भगिनी उच्च शिक्षित होत्या. दरम्यान, पाच दिवसांसाठी कुंभार समाजातील घराघरांमधील दिवे प्रज्वलित झाले.
शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाबरोबर कुंभार कन्येचा विवाह झाल्याने यात्रेत कुंभार समाजाला विशेष मान आणि महत्व आहे. यात्रेतील अक्षता, होम प्रदीपन आणि अन्य सोहळ्यासाठी कुंभार समाजाकडून ५१ घागरी हिरेहब्बू यांना दिल्या जातात. परंपरेनुसार यंदाही शुक्रवारी या ५१ घागरींचा स्वीकार हिरेहब्बू मंडळींनी केला.
यावेळी प्रमुख मानकरी योगिराज शिवलिंग म्हेत्रे-कुंभार, माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, मल्लिकार्जुन म्हेत्रे-कुंभार, संगण्णा म्हेत्रे-कुंभार, महादेव कुंभार, नागनाथ कुंभार, रेवणप्पा कुंभार, सुरेश म्हेत्रे-कुंभार, नागेश कुंभार, मल्लू कुंभार, उमदी, नागेश कोरे, सिद्धू कुंभार, हणमंतू कुंभार, चंद्रकांत कुंभार, सातप्पा कुंभार, प्रकाश कुंभार, नागेश म्हेत्रे, परमानंद कुंभार, काशिनाथ म्हेत्रे आदी उपस्थित होते.
तैलाभिषेकासाठी तेलाचे घागर शिवशेट्टींकडे
- मातीच्या ५६ घागरींपैकी एक घागर तैलाभिषेक सोहळ्यात भाविकांकडून तेल स्वीकारण्यासाठी वापरली जाते. या तेलाने शहरातील ६८ लिंगांना अभिषेक केला जातो. रविवार, दि. १३ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता या घागरीची पूजा करुन ती मानकरी योगीनाथ शिवशेट्टी यांच्याकडे हिरेहब्बू मंडळीकडे सुपूर्द करतील.