सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत २५-३० वर्षांपूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी वीरशैव व्हिजन ही संघटना सरसावली असून, घरांवर अन् दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत आवाहन करणारी ५ हजार पत्रके छापून तयार आहेत. सोमवारी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जनजागृती मोहिमेचा प्रारंभ होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
समता, एकात्मतेच्या यात्रेस ८०० वर्षांची परंपरा आहे. पूर्वी नंदीध्वज मार्गांवर भक्तगण आपल्या घरांवर, व्यापारी दुकानांवर विद्युत रोषणाई (लाईटच्या माळा) करीत असत. गेल्या २५-३० वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली. जसजसा काळ बदलला तसतसे काही नियम आले. त्यामुळे यात्रेत बदल दिसू लागले. रात्री १० नंतर वाद्य वाजविण्यास बंदी आली. या बंदीने रात्री १० नंतर विनावाद्यांनी नंदीध्वज मिरवणूक मार्गस्थ होत असते. पूर्वी ज्या-त्या व्यापारी संघटनांकडून रस्त्याच्या कडेला ट्यूब लाईट लावले जायचे. नंदीध्वज मार्गावरुन मार्गस्थ होईपर्यंत भक्तगणांचा एक मेळाच भरायचा. आता ना ट्यूब लाईट ना विद्युत रोषणाई... यामुळे नंदीध्वज कधी आले अन् कधी गेले असा प्रश्न आता मार्गांवरील भाविकांना, व्यापाºयांना पडू लागला आहे.
वास्तविक ग्रामदैवताच्या यात्रेचे दर्शन नंदीध्वजांच्या माध्यमातून शहरातील काही भागांमध्ये घडते. अशी यात्रा कुठेच होणे नाही, असे असताना मोबाईल, व्हॉट्सअॅपच्या दुनियेत युवा पिढी मात्र यात्रेपासून दूर चालली आहे. या युवा पिढीला यात्रेत सहभागी करून घेण्याबरोबर गतवैभव मिळवून देण्यासाठी वीरशैव व्हिजनचे पदाधिकारी, सदस्य यंदा यात्रेच्या १५ दिवस आधी विद्युत रोषणाई करण्याबाबत जनजागृती करणार आहेत.
मी सुरुवात केली... तुम्हीही करा- मंडलिक- वीरशैव व्हिजनने केलेल्या आवाहनास पहिला प्रतिसाद मिळाला ते स्वप्निल मंडलिक या भक्तगणाकडून. सराव काठीची त्यांच्या घरासमोर पूजा झाली. वीरशैव व्हिजनच्या केलेल्या आवाहनानंतर त्यांनी कर्णिक नगरलगत असलेल्या एकता नगरातील आपल्या ‘योगिनाथ’ या बंगल्यावर विद्युत रोषणाई केली आहे. स्वप्निल मंडलिक हे शासकीय रुग्णालयात कार्यरत असून, यात्रा होईपर्यंत ही रोषणाई राहील, असे सांगताना त्यांनी ‘मी सुरुवात केली. तुम्हीही करा’ असे आवाहनही भक्तगणांना, व्यापाºयांना केले आहे.
माजी नगरसेवक मेहता यांनी उचलला खर्च- यंदाच्या यात्रेतील मिरवणूक मार्गावर, घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई, सडा-रांगोळी करण्याबाबत वीरशैव व्हिजनने केलेल्या आवाहनास भक्तगण, व्यापाºयांमधून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. माजी नगरसेवक बाबूभाई मेहता यांनी ५ हजार पत्रके स्वत:च्या पैशातून छापून दिली आहेत.
‘लोकमत’मध्ये भक्तगणांच्या बैठकीचे वृत्त वाचले. यात्रेला गतवैभव मिळवून देण्यासाठी बाळासाहेब भोगडे, नंदकुमार मुस्तारे यांनी केलेल्या आवाहनाचा विचार केला आणि नंदीध्वज मार्गावर विद्युत रोषणाई करण्याबाबत जनजागृती करण्याचा वीरशैव व्हिजनने विडा उचलला आहे. नक्कीच त्याला व्यापारी, भक्तगण प्रतिसाद देतील.-राजशेखर बुरकुलेसंस्थापक अध्यक्ष- वीरशैव व्हिजन.
मंदिरासमोरच माझे हॉटेल आणि पान शॉप आहे. यात्रेच्या आधी मीही विद्युत रोषणाई करणार आहे. वीरशैव व्हिजनचे आवाहन प्रत्येकांनी कृतीत आणल्यास यात्रेला गतवैभव मिळाल्याशिवाय राहणार नाही.-देविदास चेंडकेहॉटेल व्यावसायिक